नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथील वरिष्ठ लिपीकाने 20 हजार रुपये लाच मागितली. त्यासंदर्भाचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील एका 59 वर्षीय तक्रारदाराने 1 मार्च रोजी तक्रार दिली की, ते 30 सप्टेंबर 2023 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून औषध निर्माता या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. विष्णुपूरीच्या शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपीक गुलाब श्रीधरराव मोरे आणि प्रशासकीय अधिकारी बालााजी बोधगिरे यांनी तक्रारदाराच्या गट विमा योजनेचे बिल निघाल्यानंतर काढलेल्या बिलाचा बक्षीस म्हणून 20 हजार रुपये लाच मागितली. पण ही रक्कम बिल निघाल्यानंतर द्यायची होती. म्हणून तक्रारदाराने नाईलाजास्तव त्या मागणीला होकार दिला. पण लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या लाच मागणीची पडताळणी 2 मार्च रोजी केली. त्यावेळी गट विमाचे पैसे आणि रजा रोखीकरणाचे पैसे प्रशासकीय अधिकारी बालाजी बोधगिरे यांच्यासाठी ही 20 हजार रुपये लाच मागितल्याचे पंचासमक्ष मान्य केले.
आज 27 मार्च रोजी तक्रारदाराने 20 हजार रुपये लाचेची रक्कम घेवून वरिष्ठ लिपीक गुलाब मोरे यांच्याकडे देण्यास पाठविले. परंतू वरिष्ठ लिपीक गुलाब मोरे यांना लाच लुचपत विभागाचा सुगावा लागला. त्यामुळे त्यांनी लाच स्विकारली नाही. तरीपण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील वरिष्ठ लिपीक गुलाब श्रीधरराव मोरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तप्रसिध्द होईपर्यंत सुरू होतील.
ही कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज, जमीर नाईक, प्रिती जाधव, पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, मेनका पवार, बालाजी मेकाले, सय्यद खदीर, अर्षद खान, ईश्र्वर जाधव आणि प्रकाश मामुलवार यांनी पुर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी इसम(एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फिस व्यतिरिक्त अन्य पैसे अर्थात लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ दुरध्वनी क्रमांक 02462-253512 किंवा टोल फ्रि क्रमांक 1064 वर याबाबतची माहिती द्यावी. जेणे करून लाच प्रकरणांना आळा बसेल.