स्वामित्वधनाच्या रक्कमा तात्काळ शासन खाती जमा करा : जिल्हाधिकारी

  • विभागांनी लेखाशिर्ष 0853 वर जमा रकमा जमा कराव्यात 

नांदेड,(जिमाका)- जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी मंजूर विकास कामाच्या अंदाजपत्रकानुसार कपात करण्यात आलेल्या स्वामित्वधनाच्या रक्कमा लेखाशिर्ष 0853 वर जमा न करता स्वतंत्र खात्यावर ठेवल्या तर तो शासकीय रक्कमेचा अपहार समजला जाईल. विभागांनी अशा प्रकारच्या रक्कमा आढळून आल्यास तात्काळ लेखाशिर्ष 0853 वर शासन खाती जमा कराव्यात. तसे न केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शासकीय रक्कमेचा अपहार केल्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील जि.प. बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभाग, विविध स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या अंतर्गत विविध विकास कामे, प्रकल्पांचे कामे, बांधकामे इत्यादीसाठी अवैध व विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुक होवू नये. तसेच या माध्यमातून कामाच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार 0853 या लेखाशिर्षावर स्वामीत्वधनाची रक्कम कपात होवून लेखाशिर्ष 0853 अंतर्गत महसूल शासनखाती जमा होणे अपेक्षित आहे. परंतु विविध विकास कामे, प्रकल्पांची कामे, बांधकामे इत्यादींच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार स्वामीत्वधनाच्या रक्कम कपात करुन 0853 या लेखाशिर्षाअंतर्गत शासन खाती भरणा न करता स्वतंत्र खात्यावर वेगळी काढून ठेवली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. विभागांनी अशा रक्कमा तात्काळ शासनखाती जमा कराव्यात, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देशित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *