पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांनी 20 हजार रुपये घेतलेली लाच परत केल्याचा अजब प्रकार घडला
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भुखंड वाद प्रकरणात पोलीस निरिक्षक यांनी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षकाकडून 20 हजार रुपये लाच घेतली. परंतू भुखंड माफियांकडून काम करण्यासाठी घेतलेली 20 हजार रुपये परत केल्याच अजब प्रकार घडला आहे.
दि.13 मार्च रोजी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम शंकरराव वरपडे यांनी पोलीस महासंचालक रश्मी पांडे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर आणि पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे अर्ज दिल्याप्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौठा शिवारात त्यांचे शेत गट क्रमांक 35 पैकी दोन भुखंड क्रमांक 24 आणि 25 त्यांनी खरेदी केले. ही खरेदी त्यांनी सौ.विजया प्रदीप मोदी आणि त्यांचे पती प्रदीप दत्तात्रय मोदी यांच्याकडून खरेदी केले. मोदींचा या भुखंडावर 1994 पासून ताबा आहे.
सोबतच शासनाने या भुखंडापैकी काही जमीन अधिगृहीत केली होती. त्याबद्दलचा मावेजा विजया प्रदीप मोदी यांना मिळाला आहे. 14 फेबु्रवारी 2022 रोजी विजया प्रदीप मोदी यांनी या भुखंडांची गुंठेवारी सुध्दा केली आहे. या भुखंडावर विजया प्रदीप मोदी यांच्या नावाने बांधकाम परवानगी सुध्दा महानगरपालिकेने दिलेली आहे.
कोणी श्रीनिवास तुलसीदास भुसेवार यांनी एक बक्षीस पत्र नोंदणीकृत केले. मुळात त्यातील संम्मती देणारा व्यक्ती आज जिवंत नाही. मी माझ्या भुखंडांवर माझ्या नावाचा फलक लावला तेंव्हा श्रीनिवास तुलसीदास भुसेवार, जिवन कागणे, माजी नगरसेवक गुरमितसिंघ उर्फ डिंपल नवाब व दुष्यंत सोनाळे यांच्यासह 10 ते 15 लोक आले आणि माझे भुखंड क्रमांक 24 व 25 हे आपले असल्याचे सांगू लागले. त्यावेळी मी नांदेड ग्रामीण पोलीसांकडे रिंदा या दहशतवाद्याचे नाव सांगून माझ्याकडून 5 लाखांची खंडणी वरील लोकांनी मागल्याचा अर्ज दिला होता. त्यावर आजपर्यंतही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
दहा दिवसांपूर्वी मी बांधकाम करण्यास सुरूवात केली असतांना एक महिला आली आणि हे भुखंड माझे आहेत अशी म्हणून लागली. ती महिला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेली तेंव्हा तिला पोलीस ठाण्यात बसवून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने त्यांचा वसुली अधिकारी पोलीस अंमलदार पचलिंग बकल नंबर 599 आणि इतर पोलीस तेथे आले आणि मलाच बांधकाम करू नका अशा धमक्या देवू लागले. तेंव्हा पचलिंगने मला तुमच्यावर काही कार्यवाही होवू देणार नाही तुम्ही 1 लाख रुपये द्या असे सांगितले. तेंव्हा तडजोड करून मी 20 हजार रुपये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात दिले. पैसे देण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये पण आला असेल.
त्यानंतर तीन-चार दिवसांनी पुन्हा नागनाथ आयलाने त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे आणि पचलिंग हे पुन्हा माझ्या बांधकामावर आले आणि मला सांगत होते. श्रीनिवास भुसेवार आणि जिवन कागणे हे पोलीस ठाण्यात बसून आहेत. तुम्ही तेथे चला प्रकरण मिटवून टाकू. त्यावेळी माझा नागनाथ आयलानेंसोबत वाद झाला. तेंव्हा नागनाथ आयलाने यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 145 प्रमाणे तुझ्यावर कार्यवाही करतो अशी धमकी देवून गेले. त्यानंतर माझ्यावर 145 ची कार्यवाही करून तहसील कार्यालयाकडे पाठवली. त्यानंतर पोलीस अंमलदार पचलिंग याने 200 रुपये दराच्या 100 नोटा मला माझ्या बांधकामच्या ठिकाणी आणून परत दिले.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुखंडांचे अनेक वाद आहेत. त्यामध्ये भुखंड माफियांकडून पोलीस सर्वसामान्य माणसांना त्रास देत आहेत. मी 34 वर्ष पोलीस दलात सेवा दिली आणि सेवानिवृत्त झालो आहे. मला कायदा माहित असतांना माझ्यासोबत असे घडते आहे. तेंव्हा ज्यांना कायदा माहित नसतो त्यांच्यासोबत नागनाथ आयलाने काय करत असतील असा प्रश्न निवेदनात उपस्थित केला आहे. सेवानिवृत्त होतांना मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिवचन दिले होते की, तुमच्या जीवनात काही अडचण आली तर आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर राहणार. उलट माझ्यावर खोट्या कार्यवाह्या केल्या जात आहेत. म्हणून पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने, त्यांचे सहाकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे, पोलीस अंमलदार पचलिंग यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी आणि भुखंड माफियांना साथ देत सर्वसामान्य माणसांना त्रास देणाऱ्या पोलीसांविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असा उल्लेख उत्तम वरपडे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.