नांदेड(प्रतिनिधी)-काल 27 फेबु्रवारी रोजी नांदेड कारागृहातून एका कच्या कैद्याला भोकर येथील न्यायालयात दरोड्याच्या तारेखसाठी नेल्यानंतर परत नांदेडच्या कारागृहात येत असतांना त्याच्या कुटूंबियांनी कपड्यात लपवून गांजा दिला. पोलीस पथकातील पोलीस उपनिरिक्षकांनी ही बाब शोधली आणि त्या गुन्हेगाराविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
काल 27 फेबु्रवारी रोजी उमरी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 240/2022 या दरोडा प्रकरणातील आरोपी शेख सोहेल शेख रज्जाक (20) रा.देगलूर नाका यास पोलीस उपनिरिक्षक प्रकाश गणपतराव आवडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी तारखेसाठी तारेखसाठी भोकर न्यायालयात नेले. भोकर न्यायालयात तारीख संपल्यानंतर आरोपी शेख सोहेलच्या नातलगांनी त्याला काही कपडे दिले. ही बाब पोलीस पथकाने मान्य केली. नांदेडला पोहचल्यानंतर कारागृहाच्या आतमध्ये जाण्याअगोदर पोलीस उपनिरिक्षक प्रकाश आवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेख सोहेलची तपासणी केली असता त्याच्या नातलगांनी दिलेल्या कपड्यांमधील निळ्यारंगाच्या जिन्स पॅन्टच्या खिशात एक गांजाची पुडी सापडली. प्रकाश आवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे शेख सोहेल शेख रजाक विरुध्द गुन्हा क्रमांक 101/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस राजू वटाणे यांच्याकडे देण्यात आला आहे.
न्यायालयातून आरोपी परत कारागृहात जात असतांना त्यांची तपासणी होणे आवश्यक आहे हे या घटनेवरुन सिध्द झाले. अशाच पध्दतीने हळूहळू वेगवेगळ्या माध्यमातून कारागृहात असे अंमली पदार्थ जात असतात आणि काही जण सांगतात की, त्या अंमली पदार्थांचा तेथे वापर होतो. पोलीस उपनिरिक्षक प्रकाश आवडे यांनी केलेल्या या कार्यवाहीचे कौतुकच केले पाहिजे.