नांदेड(प्रतिनिधी)- दहावी व बारावी परीक्षा संदर्भात समाज माध्यमांद्वारे सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या जर कोणी पसरत असेल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अशा अफवांवर जिल्ह्याचे सायबर सेल लक्ष ठेवून आहे. थेट तुरुंगात रवानगीची कारवाई अशा अफवेखोरांवर केली जाणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12) वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19मार्च 2024 व माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 20 ते 23 मार्च 2024 या कालावधीत तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
इयत्ता 12 व 10 वीच्या परीक्षा कालावधीत विविध माध्यमाद्वारे तसेच सोशल मिडीयावर परीक्षेच्या अनुषंगाने अफवा प्रसारित केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था वाढते, म्हणून अशा अफवा तसेच विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्या जाणाऱ्या बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.