नांदेड(प्रतिनिधी)-1974 मध्ये खरेदी केलेल्या भुखंडाचे दोन भाग करून त्याची विक्री केल्यानंतर असे लक्षात आले की, 1979 मध्ये त्या भुखंडाचा अर्धा भाग बनावट दस्तावेजावर विक्री करण्यात आला. तसेच दुसरा अर्धा भाग सन 2015 मध्ये बनावट कागदपत्रांवर विक्री करण्यात आला. या बाबतची तक्रार 84 वर्षीय महिलेने दिल्यानंतर 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात काही नेत्यांची नावे आहेत.
84 वर्षीय महिला प्रेमिला गोविंदराव जवादवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी मौजे असदुल्लाबाद येथील शेत सर्व्हे क्रमांक 39, भुमापन क्रमांक 10023 पैकी भुखंड क्रमांक 26 1974 मध्ये खरेदी केला होता. त्याचा दस्तनोंदणी क्रमांक 42/1974 असा आहे. त्यानंतर त्यांनी या भुखंडातील अर्धा भाग प्रशांत नरसींगराव अंकरला यांना विक्री खत क्रमांक 19619/2023 नुसार विक्री केला. तसेच दुसरा अर्धा भाग अजय नागनाथ गोपीवार यांना विक्री खत क्रमांक 19618 /2024 नुसार विक्री केला.
त्यानंतर त्यांना समजले की, कोणी तरी प्रकाश वसंतराव कामारीकर यांनी त्यांच्या नावाने असलेल्या भुखंडाचा अर्धाभाग बनावट विक्री खत क्रमांक 2790/1979 प्रमाणे विक्री केला. तसेच तो अर्धा हिस्सा बन ावट विक्री खत क्रमांक 2791/1979 प्रमाणे माझ्याकडून खरेदी केल्याचे दाखवले. त्या विक्री खतावर माझी स्वाक्षरी नाही तो बनावट दस्त आहे. त्यानंतर इतर काही जणांनी बनावट खरेदी खत क्रमांक 7553/2015 नुसार माझ्या भुखंडाशी काहीही संबंध नसतांना वारसदार म्हणून बनावट विक्रीखत केले. तो भुखंड आकाश प्रदीप व्यवहारे यांना विक्री केलेला आहे.
पुढे 2 जून 2024 रोजी काही जणांनी तुमचा प्लॉट आमच्या नावावर करून देण्यासाठी संम्मती द्या असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. शेत सर्व्हे क्रमांक 39 भुमापन क्रमांक 10023 पैक्की एक भुखंड ज्याचा क्रमांक 26 आहे तो भुखंड ओमप्रकाश शामलाल राठौर, ग्यानप्रकाश शामलाल राठौर, सौ.ज्योती मदनलाल राठौर, सौ.शशि अनिलकुमार राठौर, प्रकाश वसंतराव कामारीकर, मधुकर किशनराव रोटे, आकाश प्रदीप व्यवहारे, गोविंदरराव रावणराव उमरेकर पाटील, संतोष साईअन्ना मदनवाड, रामचंद्र गंगाधर कऱ्हाळे, अशोकराव रावणराव उमरेकर पाटील या 11 जणांनी मिळून खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट विक्री खत केले आहे. मी ज्यांना हा भुखंड विकला आहे त्यांना नाहक त्रास देत आहेत. आमचा प्लॉट हडप करण्याच्या उद्देशाने जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत तरी योग्य कायदेशीर कार्यवाही व्हावी.
भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 471, 504, 506, 34 नुसार गुन्हा क्रमांक 372/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.