नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यलक्ष्मी सहकारी बॅंकेचे किनवट येथील एटीएम मशीनच्या पासवर्डने उघडून त्यातून 17 लाख 39 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणात लाखो रुपये चोरी गेले असतांना किनवट पोलीसांनी मात्र अदखलपात्र कलम जोडून गुन्हा दाखल केला आहे.
एटीएम फोडून, एटीएम मशीनला वेगवेगळे नुकसान करून त्यातील रक्कम चोरल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत. शिवाजी चौक किनवट येथे दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बॅंक लि.नांदेड यांचे एटीएम आहे. या शाखेचे व्यवस्थापक संजयकुमार ज्ञानोबाराव इटकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 ऑगस्टच्या सकाळी 8 ते 6 ऑगस्टच्या सकाळी 10 वाजेदरम्यान या एटीएममधून 17 लाख 39 हजार 500 रुपये चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी एटीएम मशीनला कोणतेही नुकसान केलेले नाही. तक्रारीत लिहिल्याप्रमाणे एटीएम मशीनचा पासवर्ड वापरूनच चोरट्यांनी ही चोरी केलेली आहे. एटीएम मशीनचा पासवर्ड काही निवडक माणसांनाच माहित असेल. याचा अर्थ घरात कोणी तरी गद्दार आहे. आता तो गद्दार शोधण्याची जबाबदारी पोलीसांवर आहे. याप्रकरणी किनवट पोलीसांनी भारतीय न्याय संहिता-2023 मधील कलम 303(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 235/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास किनवटचे पोलीस उपनिरिक्षक झाडे हे करीत आहेत.
किनवट पोलीसांनी या एटीएम चोरी प्रकरणात भारतीय न्याय संहितेचे कलम 303(2) लावले आहे. ही बाब थोडीशी हस्यास्पद वाटते. भारतीय न्याय संहितेमध्ये 303(2) या कलमाच्या व्याख्यमधे जर चोरीची रक्कम 5 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर ती घटना कलम 303(2) मध्ये येते. पण या प्रकरणात 17 लाख 39 हजार 500 रुपयांची चोरी झाली आहे. मग ही कलम 303(2) मध्ये येतच नाही तरी पण किनवट पोलीसांनी हे कलम लावले आहे हा संशोधनाचा विषय आहे.
कलम 303(2) च्या संदर्भाने वास्तव न्युज लाईव्ह वसई (नवीमुंबई) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भाची बातमी 6 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली होती. त्या आदेशात त्या प्रकरणात कलम 303(2) हे होते आणि या प्रकरणातील आरोपीला अटक का केली म्हणून न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाच्या तपासीक अंमलदाराला कारणे दाखवा नोटीस काढली होती. पण तो घटनाक्रम 5 हजार रुपयांपेक्षा कमी होती. किनवट येथील एटीएम चोरी हे प्रकरण लाखो रुपयांमध्ये आहे. म्हणजेच भारतीय न्याय संहितेतील कलम 303(2) लावले जावूच शकत नाही पण म्हणतात ना पोलीस खाते करील तेच होईल.
संबंधीत बातमी…
पोलीसांनो लक्ष ठेवा नसता तुम्हाला सुध्दा कारणे दाखवा नोटीस मिळेल