लातूर (प्रतिनिधी)-आंबेडकरी जनतेच्या एकजुटीने जून मध्ये झालेल्या एका अल्पवयीन बालिकेच्या खून प्रकरणी कन्या छात्रालय चालविणाऱ्या महिलेसह तिच्या दोन मुलांवर अत्याचार करणे, खून करणे यासह ऍट्रॉसिटी कायद्यान्वये लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
अनुसूचित जातीच्या अल्पवयीन बालिकेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या दोन मुली अनुक्रमे 15 आणि 11 वर्ष वयाच्या या लातूर येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होत्या आणि कस्तुरबा कन्या छात्रालय मागसवर्गीय मुलींचे वस्तीगृह, भुविकास बॅंकेच्या पाठीमागे लातूर येथे सन 2023 पासून राहत होत्या. एप्रिल 2024 मध्ये मी मुलींना भेटायला गेलो असता त्यांनी सांगितले की, वस्तीगृह संचालिका आशा सदाशिव गुट्टे व त्यांची मुले विठ्ठल सदाशिव गुट्टे आणि शंकर सदाशिव गुट्टे हे विनाकारण आम्हाला कार्यालयात बोलवतात, मारहाण करतात आणि छळ करतात. त्यातील 15 वर्षीय बालिकेने सांगितले की, मला रात्रीच्यावेळी विठ्ठल गुट्टे आणि शंकर गुट्टे बोलावून माझ्या रिरावरन हात फिरवत अश्लील चाळे करीत असतात. यास मी विरोध केला असता तुला आणि तुझ्या बहिणीला इमारतीवरुन फेकून देवू अशी धमकी दिली. मी याबद्दल आशा गुट्टे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मला उडवा-उडवीची उत्तरे दिली आणि मलाच खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलींनी सांगितले की आम्हाला येथे त्रास होत आहे तेंव्हा मी मुलींना अभिवचन दिले होते की, मी तुम्हाला लवकरच येथून घेवून जाईल.
28 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता वस्तीगृह संचालिका आशा गुट्टे यांनी मला कॉल करून सांगितले की, तुमची 15 वर्षीय बालिका पायात दोरी अडकवून पडली आहे. आम्ही तिला दवाखान्यात घेवून आलो पण दवाखान्यात आणण्यापुर्वीच ती मुलगी मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मी दवाखान्यात गेलो तेंव्हा माझी दुसरी मुलगी 11 वर्षीय बालिका तिला विचारणा केली असता तिने सांगितले की, दीदी रात्री रुममध्ये नव्हती तिला विठ्ठल गुट्टे आणि शंकर गुट्टे यांनी बोलावले होते आणि जातांना मला धमकी दिली होती. दीदी जात नव्हती तेंव्हा त्या दोघांनी तिला मारहाण करून ओढून घेवून गेले होते आणि सकाळीच मला कळाले की, दीदी पडली आहे आणि तिला खूप मार लागला आहे. माझी बालिका पडली त्या ठिकाणी रक्त पुसलेले दिसत आहे. तरी माझ्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी.
या संदर्भाने आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव चंद्रकांत चिकटे, मराठवाडा सचिव अशोक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठले आणि सर्वांनी पोस्टमार्टम अहवालानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यानंतर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 376(2) (फ), 354, 506, 34 तसेच पोक्सो कायद्याची कलमे 5, 6 आणि 10 तसेच ऍट्रॉसिटी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा क्रमांक 455/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये आरोपी या सदरात छात्रावास संचालिका आशा सदाशिव गुट्टे, त्यांची मुले विठ्ठल सदाशिव गुट्टे आणि शंकर सदाशिव गुट्टे यांची नावे आहेत.