नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नवनियुक्त पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी 19 जुलैपर्यंत पदभार स्विकारुन नये अशी स्थगिती केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी जारी केली आहे. सध्याचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आपल्या बदलीविरुध्द न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती.
मंगळवार दि.9 जुलै रोजी राज्य शासनाच्या गृहविभागाने काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये नांदेड येथील विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविले होते आणि त्यांच्या जागी विशेष शाखा मुंबई येथे कार्यरत शहाजी उमाप यांना पोलीस उपमहानिरिक्षक पदोन्नतीसह नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पद अवनत करून त्यांना नांदेड पोलीस परिक्षेत्रात नियुक्तीचे आदेश दिले होते.
एक वर्षापुर्वी नांदेड येथे आलेले डॉ.शशिकांत महावरकर सुध्दा त्यावेळी पोलीस उपमहानिरिक्षकच होते. एप्रिल 2024 मध्ये त्यांची विशेष पोलीस महानिरिक्षक ही पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर बदल्यांच्या कायद्याप्रमाणे त्यांना दोन वर्षाचा कार्यकाळ या पदावर मिळणे अपेक्षीत होते. परंतू शासनाने त्यांना पदोन्नती दिल्यानंतर 70 दिवसांतच त्यांची बदली केल. या बदलीविरुध्द त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यथे मुळ अर्ज क्रमांक 707/2024 दाखल करून माझी बदली ही विहित कालखंडापुर्वी झालेली आहे असा अर्ज दाखल करून स्थगिती मागितली. या अर्जाची सुनावणी काल 11 जुलै रोजी झाली आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत शहाजी उमाप यांनी 19 जुलैपर्यंत या पदाचा कार्यभार स्विकारू नये असे आदेश दिले आहेत. या प्रकरणात राज्य शासनाच्या गृहविभागाला आणि इतरांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे. त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जुलै रोजी होणार आहे. त्या अगोदर प्रतिवादी आपले म्हणणे न्यायाधीकरणाकडे सादर करतील पण आज नांदेडला आलेले पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना नांदेड पोलीस परिक्षेत्राचा प्रभार घेता येणार नाही अशी माहिती सायंकाळी 5वाजेच्यासुमारास प्राप्त झाली म्हणून स्थगितीची माहिती त्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयास कळविली असून सध्या तरी त्यांना परत जावे लागेल अशी परिस्थिती आहे.