नांदेड(प्रतिनिधी)-सरकारी नोकरी लावतो म्हणून अनेकांना 16 लाख 30 हजार रुपयांचा चुना लावणाऱ्या तिघांविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपीला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शंकर व्यंकटराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जानेवारी 2022 ते 19 जून 2024 पर्यंत त्यांच्या घरी बालाजी गोविंदराव शिंदे, सौ.साधना कृपासिंह शाह आणि अविनाश तुळशीराम राठोड या तिघांनी त्यांना आणि अनेक जणांना सरकारी नोकरी लावतो म्हणून आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून शंकर पवार आणि इतर अनेक जणांनी या तिघांच्या नावावर फोन पे द्वारे आणि रोख रक्कमेत 16 लाख 30 हजार रुपये दिले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर शंकर पवार आणि इतरांनी याबाबत तक्रार दिली. विमानतळ पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 192/2024 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद साने यांच्याकडे देण्यात आला. विनोद साने यांनी बालाजी अविनाश शिंदेला अटक केली. काल दि.19 जून रोजी न्यायालयाने बालाजी शिंदेला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.