समरसतावादाच्या नावाखाली समतेचे ढोंग करणाऱ्यांची वैचारिक घालमेल आज उघडपणे समोर येत आहे. समतेचा मुखवटा घालून सामाजिक वर्चस्वाची मानसिकता जपणाऱ्यांचा हा आक्रस्ताळेपणा पाहून आसुरी आनंद होत आहे. जोतीराव फुले यांची साहित्यविषयक भूमिका केवळ साहित्याच्या सौंदर्यापुरती मर्यादित नव्हती. साहित्य समाजातील विषमता, धार्मिक अंधश्रद्धा, जातीय वर्चस्व आणि शोषण यांना प्रश्न विचारणारे असावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे सामाजिक वास्तवापासून अलिप्त राहून साहित्यिक प्रतिष्ठा, भाषेचा अभिजातपणा आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्व यांचा बडेजाव करणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी उपरोधाने टीका केली. जोतीराव फुले यांनी ‘घालमोडे दादा’ असा केलेला शब्दप्रयोग आजच्या या वैचारिक घालमेलीत पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटतो. हे सगळे पाहून हसावे की रडावे, हेच कळत नाही. पुस्तक हातात आहे, वाचता येते; पण पुस्तक वाचणे आणि त्यातून वैचारिक प्रगल्भता निर्माण होणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. शरणकुमार लिंबाळे यांना शंकराचार्य केले किंवा संघाचे सरसंघचालक बनवले, तरी फुले-आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. कारण आमचा संघर्ष व्यक्तींच्या पदांशी नाही, तर जातीय वर्चस्वाच्या विचारांशी आहे. पदे देऊन विचारधारा बदलत नाहीत आणि व्यक्तींचा सन्मान करून सामाजिक विषमतेचे समर्थनही करता येत नाही. शरणकुमार लिंबाळे यांनी केवळ अक्करमाशी लिहिली नाही; तर जातिव्यवस्थेच्या विदारक वास्तवाला शब्द दिले आहेत. ते खऱ्या अर्थाने वैचारिक अस्मितेचे आणि सामाजिक वास्तवाचे लेखक आहेत. परंतु उतरवयात त्यांची ही भूमिका स्पष्ट झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! शरणकुमार लिंबाळे यांच्या उतारवयात झालेली ही वैचारिक अक्करमाशी वाचक आणि लेखक म्हणून पाहताना खरोखरच खेद वाटतो. ज्यांच्या लेखनाने जातिव्यवस्थेच्या विदारक वास्तवाला शब्द दिले, त्यांच्याकडून समरसतेच्या नावाखालील वैचारिक तडजोड पाहावी लागणे, ही दुर्दैवी बाब आहे. लेखकाचे साहित्य मोठे असू शकते; मात्र लेखकाच्या प्रत्येक भूमिकेची चिकित्सा करण्याचा अधिकार वाचकाला आहे. व्यक्ती कितीही मोठी असली, तरी विचारांची चिकित्सा थांबता कामा नये. समरसतेच्या नावाखाली विषमतेचे समर्थन करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—फुले-आंबेडकरवादी विचारधारा पद, प्रतिष्ठा, प्रलोभन आणि सत्तेच्या तुकड्यांवर विकली जाणारी विचारधारा नाही. ती विषमतेच्या मुळावर घाव घालणारी विचारधारा आहे. तूर्तास एवढेच ! – डॉ. राजू सोनसळे, नांदेड Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation २६ नोव्हेंबर : भारतीय संविधानाचा गौरवशाली ऐतिहासिक दिवस!