कॉ. शैलेंद्र कांबळे यांची राज्य निमंत्रकपदी फेरनिवड; सहनिमंत्रकपदी सुंगधी फ्रँसीस, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, डॉ. आदिनाथ इंगोले यांची निवड नांदेड (प्रतिनिधी) – जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि स्त्रीदास्य व्यवस्था विरोधात व्यापक संघर्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त करीत जातीअंत संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी आयोजित या अधिवेशनाला राज्यभरातील विविध सामाजिक, राजकीय व परिवर्तनवादी चळवळीतील मान्यवरांची उपस्थिती होती. अधिवेशनात जातीय अत्याचार, सामाजिक विषमता, शोषण, अन्याय आणि संविधानिक मूल्यांवरील आघात यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाचे उद्घाटन मार्क्सवादी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या हस्ते झाले. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी माजी खासदार कॉ. रामचंद्र डोम, माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. डॉ. अशोक ढवळे, दलित शोषण मुक्ती मंचचे राष्ट्रीय सहसचिव कॉ. विक्रम सिंह, माकपचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. विजय गाभणे, जातीअंत संघर्ष समितीचे महाराष्ट्र समन्वयक कॉ. शैलेंद्र कांबळे आणि निमंत्रक कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांच्यासह सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनात जातीअंत संघर्ष समितीच्या राज्य निमंत्रकपदी कॉ. शैलेंद्र कांबळे यांची फेरनिवड करण्यात आली. तर सहनिमंत्रकपदी सुंगधी फ्रँसीस, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, डॉ. आदिनाथ इंगोले, तर नांदेडचे कॉ. गंगाधर गायकवाड आणि कॉ. जनार्दन काळे यांची राज्य सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उपरोक्त राज्य अधिवेशनात राज्यभरातून २५० प्रतिनिधी सामील झाले होते. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी गठित संयोजन समितीमध्ये अध्यक्ष कॉ. विजय गाभणे, कार्याध्यक्ष डॉ. आदिनाथ इंगोले, सहकार्याध्यक्ष कॉ. उज्ज्वला पडलवार आणि सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यभरातून आलेले प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनातून जातीय भेदभाव, वर्णव्यवस्था, स्त्रीदास्य, सामाजिक अन्याय आणि शोषणाविरुद्धचा लढा अधिक व्यापक करण्याचा संदेश देण्यात आला. संविधान, लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्यासाठी सर्व परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. जातीअंताची चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार या अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी डॉ. अशोक बनसोड, प्रा प्रमोद वाघमारे,कॉ.जयराज गायकवाड कॉ.शाम सरोदे , कॉ.सुभाषचंद्र गजभारे, मंगेश वट्टेवाड,कॉ. लता गायकवाड, कॉ . मेघा इंगोले ,कॉ. मीना आरसे, कॉ. करवंदा गायकवाड,तेजस गायकवाड, प्रदीप महाजन,धरती महाजन आदींनी प्रयत्न केले. Kanthak Suryatal Post Views: 9 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जातिव्यवस्थेच्या अंताशिवाय सामाजिक क्रांती शक्य नाही!-डॉ.आनंद तेलतुंबडे