नांदेड (प्रतिनिधी) – स्त्रीभ्रूणहत्या, स्त्रियांवरील अत्याचार, त्यांची असुरक्षितता आणि समाजातील स्त्रीविषयक मानसिकता यांसारख्या गंभीर प्रश्नांवर भाष्य करणारे ‘गर्भ’ हे नाटक स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या वतीने 65 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये दि.२१ नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आले. लेखक व दिग्दर्शक दिनेश कवडे यांनी या नाटकाच्या माध्यमातून एका आईच्या मनातील भीती, अस्वस्थता आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी नाट्यरूपांतर केले आहे. आज समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांची असुरक्षितता आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक घालमेल हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. आपल्या पोटी मुलगी जन्माला आली तर तिला सुरक्षित आणि सन्मानाचे आयुष्य देता येईल का, या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या एका आईच्या मनातील संघर्षातून ‘गर्भ’ या नाटकाची निर्मिती झाली आहे. रंगमांचाच्या मध्यभागी वाळलेल्या झाडाच्या फांदीवर टांगलेला रक्ताने माखलेला एका मुलीचा ड्रेस ही प्रतिमा स्त्रीच्या वाट्याला आलेली उपेक्षा, तिचा संघर्ष आणि समाजातील स्त्रीविषयक मानसिकता अधोरेखित करते. नाटकातील केंद्रस्थानी असलेली महिला, तिचा संघर्ष आणि परिवर्तनाचा प्रवास हा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा आहे. प्रतीकात्मक रंगभाषा, समूह, सावल्या, प्रकाश आणि ध्वनी यांच्या प्रभावी वापरातून समाजातील विविध वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ नियम आणि कायदे बदलून समाज बदलणार नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासोबतच माणसांचे विचार बदलणे आवश्यक आहे. मुलगी वाचवण्याच्या घोषणा देण्यापेक्षा तिला निर्भयपणे जगता येईल, असे वातावरण निर्माण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश हे नाटक देते. नाटकातील कलाकार : गंगाधर, दारुड्या आणि सावली चार – गौतम गायकवाड, आई – सपना वाघमारे, गर्भ – आराध्या पांचाळ, सावली एक व व्यक्ती दुसरा – परीक्षित पांचाळ, व्यक्ती एक, पाच आणि सावली – सुरेश उबाळे, देविदास आणि सावली – अनुज भटकुर, स्त्री पहिली – सुजाता नमकर, स्त्री दुसरी – नयना वसो, स्त्री चौथी – सानिका शिंदे, स्त्री तिसरी – पायल कदम आणि सावली दुसरी – आदित्य शिरसीकर. तांत्रिक बाजू :संगीत संयोजन – अथर्व देसाई, प्रकाशयोजना – अनिल दुधाटे, रंगभूषा व नृत्य दिग्दर्शन – सुधांशू सामलेट्टी, नेपथ्य – दिनेश कवडे व गौतम गायकवाड, वेशभूषा – किरण टाकळे व शांती देसाई. गर्भ हे नाटक केवळ एका आईच्या मनातील प्रश्न मांडत नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेसमोर आरसा धरते. स्त्रीला सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि निर्भय आयुष्य मिळावे, यासाठी केवळ विचार न करता प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा देणारा हा नाट्यप्रयोग ठरतो. आज दि २३ रोजी ठीक सायं.७ वा लीला आर्ट फाऊंडेशन निर्मित कुंपणा पलीकडले हे नाटक सादर होणार आहे तरी जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 181 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जेनवेव नाटकाचे सादरीकरण कुंपणापलीकडले नाटकाने घेतला मतिमंद मुलांच्या कौटुंबिक संघर्षाचा संवेदनशील वेध