४८ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त; उत्तर प्रदेशातील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल मनाठा (प्रतिनिधी) – गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मनाठा पोलिसांनी धडक कारवाई करत ७९ बैलांची सुटका केली. या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर आणि ७९ गोवंशीय जनावरे असा एकूण ४८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन आरोपींविरुद्ध मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ६ नोव्हेंबर २०२६ रोजी मनाठा पोलिसांना हदगाव ते वारंगा रोडवरून एका कंटेनरमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राघुपाल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन इंगोले व त्यांच्या पथकाने मनाठा पाटीजवळ वाहन तपासणी सुरू केली. यावेळी हदगावकडून वारंगाच्या दिशेने येणारा अशोक लेलँड कंपनीचा (क्र. NL-01/AK-7379) कंटेनर पोलिसांनी थांबवून तपासणी केली. कंटेनरमध्ये ७९ बैल अत्यंत निर्दयीपणे, पायांना दोरीने बांधून आणि क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने भरल्याचे आढळून आले. जनावरांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता त्यांना उपाशीपोटी अमरपाटन (जि. मैहर, मध्य प्रदेश) येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. वाहनचालकाकडे जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचेही समोर आले. या प्रकरणी मोहम्मद बिलाल अजिज (वय ३०, रा. अमरोहा, उत्तर प्रदेश) आणि मोबीन अहमद मोहम्मद इसरार (वय ३४, रा. कौशांबी, उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या पंचनाम्यात ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि १८ लाख १२ हजार रुपये किमतीचे ७९ बैल असा एकूण ४८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०७/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राघुपाल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन इंगोले तसेच पोलीस अंमलदार रेणुसाद भोपाळकर, रामराव राठोड, शंकर सोनटक्के आणि अतुल नागरगोजे यांच्या पथकाने केली. नागरिकांना पोलिसांचे आवाहन गोवंशाची अवैध वाहतूक, जनावरांवर क्रूरता किंवा कत्तलीसाठी संशयास्पद पद्धतीने जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 7 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गवंडगाव शिवारात अवैध तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा दाखल