मोटारसायकली, मोबाईलसह २ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी फरार

नायगाव (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नायगाव पोलिसांनी गोळेगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध तिरट जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून चार मोटारसायकली, सहा मोबाईल फोन आणि रोख रकमेसह एकूण २ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील तीन आरोपी फरार झाले आहेत.

दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नायगाव पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना नायगाव ते गोळेगाव मार्गावरील शेतशिवारात मोकळ्या जागेत काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत अशोक विठ्ठलराव पवार (वय ४२, रा. बोमनाळे गल्ली, नायगाव), गणेश भाऊराव देगांववे (वय ३०, रा. जुनेगाव, नायगाव), मारोती सदाशिव चव्हाण (वय ३१, रा. जुनेगाव, नायगाव), अविनाश शिवाजीराव मोहिते (वय २९, रा. जुनेगाव, नायगाव), जावेद सरदार शेख (वय ४२, रा. विठ्ठलनगर, नायगाव) आणि देविदास ऊर्फ देवा तमनबोईनवाड (रा. बेळगेनगर, नायगाव) यांच्यासह अन्य तिघे फरार झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून सहा विविध कंपन्यांचे मोबाईल फोन (किंमत ४५ हजार ८०० रुपये), चार मोटारसायकली (किंमत २ लाख १० हजार रुपये), रोख ११ हजार १०० रुपये आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप देगलुरकर तसेच पोलीस अंमलदार पवार, पुणेबोईनवाड आणि शेरीकर यांनी ही कारवाई पार पाडली. जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!