एकाच संस्थेच्या दोन दिव्यांग शाळा; एका शाळेत भव्य पालकसभा, दुसरीकडे आठ वर्षांपासून पालकसभेचा अभाव?

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील मगनपुरा परिसरात राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचलित मालपाणी निवासी मतिमंद विद्यालयात ३ नोव्हेंबर रोजी उत्साहात भव्य पालकसभा पार पडली. या सभेला विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, वाचा उपचारतज्ज्ञ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालकांसाठी भोजन व चहापानाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र, याच संस्थेच्या प्रांगणात असलेल्या श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाच्या पालकसभा आयोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्याध्यापक मुरलीधर पाटील यांच्या २०१७ पासूनच्या कार्यकाळात नियमित पालकसभा झाल्या आहेत का? झाल्या असल्यास त्यांचे इतिवृत्त, उपस्थिती नोंदवही आणि पालकांना दिलेल्या सूचनांची तपासणी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिवाळीच्या सुटीत निवासी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालक शाळेत येतात. अशा वेळी त्यांच्या भेटीला पालकसभा म्हणून दाखविण्यात आले आहे का, याचीही नोंदींच्या आधारे पडताळणी करण्याची मागणी होत आहे. पालकसभा आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठका प्रत्यक्षात नियमित झाल्या आहेत का, अनिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना सहभागी करून घेतले जाते का, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे. याशिवाय मुख्याध्यापकांच्या अध्यापनातील सहभागाबाबत, शैक्षणिक उपक्रम, सहली, पालकांशी समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत पालक व कर्मचाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः मागील पाच-सहा महिन्यांच्या हजेरीपत्रकांची नोंद नव्याने तयार करण्यासाठी शिक्षकांवर दबाव आणल्याचा आरोपही पुढे येत आहे. या आरोपांची मूळ हजेरीपत्रके, शाळेचे अभिलेख आणि पटपडताळणीच्या नोंदी तपासून स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता आहे. एकेकाळी प्रवेशासाठी ३० ते ४० विद्यार्थी प्रतीक्षेत असलेल्या या विद्यालयात आता विद्यार्थीसंख्या कमी होत असल्याची चर्चा आहे. विद्यार्थीसंख्येतील घट, प्रत्यक्ष उपस्थिती आणि शासकीय अभिलेखांमधील नोंदी यांचीही पडताळणी होणे गरजेचे आहे.

दिव्यांग शाळा संहिता आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आवश्यक सुविधा आणि पालकांचा सहभाग मिळतो आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत संबंधित विद्यालयाची नियमित तपासणी होते का, तक्रारींची दखल घेतली जाते का आणि तपासणीची कार्यवाही कितपत निष्पक्ष आहे, याबाबतही स्पष्टीकरण अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पालकसभा नोंदवही, शालेय व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त, शिक्षकांची हजेरी, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक अभिलेखांची तपासणी करावी. तसेच संबंधित मुख्याध्यापक व संस्थेची बाजू जाणून घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी दिव्यांग हक्कांसाठी कार्यरत संघटनांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!