अवैध मोटार पंप व विद्युत जोडण्या जप्त करण्याचे नांदेड-यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नांदेड –  दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पैनगंगा प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. नदीपात्रातून होणारा अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. यासंदर्भात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.

पाटबंधारे व महावितरण विभागाने नदीपात्रातील पाणी उपशाची दररोज पाहणी करून अनधिकृत मोटार पंप व विद्युत जोडण्या जप्त कराव्यात. गरजेनुसार संबंधित भागातील विद्युत डी.पी. बंद करण्याची कार्यवाही करावी. तसेच नदीकाठच्या गावांतील पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक यांनी नियमित पाहणी करून अनधिकृत पाणी उपशाची माहिती संबंधित विभागांना द्यावी, असे निर्देश देण्यात आले. यंदा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्याने त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करावी आणि ऊसासारखी अधिक पाणी लागणारी पिके टाळावीत, यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण व चार पाणीपाळ्यांना परवानगी असली तरी पाण्याचा अनधिकृत उपसा अथवा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस दोन्ही जिल्ह्यांचे पाटबंधारे व महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रभावी नियोजन व काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!