नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव विटभट्टी परिसरात पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीने पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीतील संडास रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशील महाजन हैबते, वय ३८ वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार टाकळी दरेगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड असे आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.या आत्महत्येचा तपास कोठडीतील मृत्यू असल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तपास करणार आहे. घटनाक्रम आणि पोलीस तपास पोलीस निरीक्षक अशोक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ३:१५ वाजेच्या सुमारास धनेगाव परिसरातील विटभट्टीवर एका महिलेने फाशी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, मयत छाया सुशील हैबते हिची बहीण दीक्षा कांबळे हिने तिची बहीण छाया हिचा खून तिचा पती सुशील हैबते याने गळा आवळून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी सुशील हैबते याला ताब्यात घेतले असता, त्याने पत्नीचा ओढणीच्या लेसने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पोलीस ठाण्याच्या इमारतीत गळफास पत्नीच्या खुनाची कबुली दिल्यानंतर आरोपी सुशील हैबते याला पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले होते. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:१० वाजेच्या सुमारास जुन्या इमारतीच्या संडास रूममधून शेजारी बसलेल्या इतर तपासातील आरोपींनी – शेख अफरोज शेख शब्बीर व आझम खान गोस खान – आरडाओरड करून माहिती दिली.पोलीस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, सुशील हैबते याने संडासच्या खिडकीच्या अँगलला वायरच्या साहाय्याने गळफास घेतलेला आढळला. तसेच त्याच्या पायाजवळ एक बकेट उलटी पडलेली दिसून आली. गुन्हा व पोलीस नोंद पत्नीचा खून केल्यानंतर घाबरून, घटनेच्या पश्चात्तापाने अथवा अटकेच्या भीतीने आरोपी सुशील हैबते याने आत्महत्या केल्याचे पोलीस जबाबात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पत्नीच्या खुनाबाबत गुन्हा नोंद क्रमांक १४१८/२०२६ कलम १०३ १ बीएनएस आणि संशयिताच्या आत्महत्येबाबत आकस्मिक मृत्यू क्रमांक ९५/२०२६ कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सुगावे ह्या करीत आहेत. या घटनेचा आढावा घेण्यासाठी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक यशवंत काळे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात गम्मत अशी आहे की मरण पावलेला आरोपी सुशील हैबते यास नांदेड ग्रामीण पोलिसांनी आपल्या ताब्यात तर रात्रीच घेतले.पण छायाच्या मृत्यूचा गुन्हा क्रमांक १४१८/२०२६ दुपारी ४ वाजून ५२ मिनीटाला दाखल करण्यात आला आहे. हा १२ तासांचा उशीर मात्र अवधड आहे. अकस्मात मृत्यूची तक्रार रात्री ८ वाजता स्टेशन डायरी क्रमांक ४४ वर नोंद करून दाखल करण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 71 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रलंबित महसुली दाव्यांचा तडजोडीतून कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 5 नोव्हेंबरला महसूल लोक अदालत