नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक 02.11.2026 रोजी सकाळी 04:00 ते 20:00 वाजेपर्यंत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत नांदेड विभागातील सर्व तिकीट तपासणी पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.

ही मोहीम शैलेश कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या देखरेखीखाली राबविण्यात आली. मोहिमेत एकूण 33 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 02 RPF कर्मचारी सहभागी झाले. या पथकांनी एकूण 26 गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली. या मोहिमेदरम्यान देवगिरी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, राज्य राणी एक्स्प्रेस, श्री गंगानगर एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, कृष्णा एक्स्प्रेस, बंगलोर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, यांसह विविध गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. मोहिमेदरम्यान विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची एकूण 728 प्रकरणे आढळून आली असून त्यातून ₹4,87,120/- इतका महसूल प्राप्त झाला.

प्रकरणांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

* विनातिकीट प्रवास : 393, भाडे –  ₹1,78,825, पेनाल्टी –  ₹1,97,130
* अनियमित प्रवास : 96, भाडे –  ₹26,120, पेनाल्टी – ₹48,000
* अन बुक्ड लगेज : 239, पेनाल्टी : ₹37,045

एकूण : ₹4,87,120/- इतका महसूल प्राप्त झाला.

या व्यापक मोहिमेअंतर्गत नांदेड ते आदिलाबाद, पूर्णा ते अकोला, परभणी ते परळी तसेच परभणी ते मनमाड या मार्गांवर विविध ठिकाणी गाड्यांची तपासणी करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना नेहमी वैध तिकीट किंवा अधिकृत प्रवास अधिकारपत्र सोबत ठेवावे आणि योग्य श्रेणीचे तिकीट घेऊनच प्रवास करावा. तिकीट नसताना किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणे हा दंडनीय प्रकार असून अशा प्रवाशांवर रेल्वे नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. प्रवाशांनी अनधिकृत व्यक्तींकडून तिकीट खरेदी करू नये तसेच इतर प्रवाशांच्या तिकिटावर प्रवास करू नये. रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित, सुव्यवस्थित व शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्रवाशांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. वैध तिकीटासह प्रवास करा आणि सुरक्षित व सुलभ रेल्वे प्रवासासाठी सहकार्य करा,असे आवाहन नांदेड विभागीय रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!