उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांची एक वैचारिक भेट नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जात असताना हार-तुरे, पुष्पगुच्छ यांसारख्या औपचारिक स्वागतापेक्षा सामाजिक संवेदनशीलता आणि वैचारिक मूल्यांना प्राधान्य देण्याचा एक प्रेरणादायी संदेश नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची काल नांदेड विमानतळावर भेट घेताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वामी विवेकानंद यांच्या आत्मचरित्राचा ग्रंथ भेट देत त्यांचे स्वागत केले. या पुस्तकावर एक वैचारिक भेट असा उल्लेख करण्यात आला होता. त्यांच्या या अनोख्या भेटीने स्वागताच्या पारंपरिक पद्धतीला एक वेगळे वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले. राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हार-तुरे आणि पुष्पगुच्छांवर होणारा खर्च टाळण्याचा संदेश दिला जात असताना, पुस्तक भेट देऊन स्वागत करण्याची ही संकल्पना विशेष लक्षवेधी ठरली. कारण फुलांचा सुगंध काही काळापुरता असतो; मात्र पुस्तकातील विचारांचा सुगंध पिढ्यान्पिढ्या दरवळत राहतो. स्वामी विवेकानंदांचे विचार म्हणजे आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम, चारित्र्यनिर्मिती, मानवसेवा आणि सकारात्मक जीवनदृष्टीची प्रेरणा. अशा महान विचारांचा ठेवा उपमुख्यमंत्र्यांना भेट देणे, ही केवळ स्वागताची औपचारिकता नसून ज्ञानसंस्कृतीचा सन्मान करणारी कृती आहे. हार-तुरे कोमेजतात, पण विचार कधीच कोमेजत नाहीत! हा संदेश डॉ. नीलाभ रोहन यांच्या या कृतीतून अधोरेखित झाला. सामाजिक परिस्थितीचे भान राखत स्वागताच्या परंपरेत सकारात्मक बदल घडवून आणणारी त्यांची ही वैचारिक भेट निश्चितच प्रशंसनीय असून, सार्वजनिक जीवनात ज्ञान, विचार आणि सामाजिक संवेदनशीलतेला प्राधान्य देण्याचा आदर्श घालून देणारी आहे. Kanthak Suryatal Post Views: 29 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-4 : महिनाभरात 1,402 गुन्हे दाखल; 40 कोटींचा मुद्देमाल जप्त