कंधार (प्रतिनिधी) – प्रशासकीय आदेशांची पायमल्ली आणि सक्तीची वसुली जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या खळबळजनक घटना घडल्यानंतर प्रशासनाने सक्तीच्या वसुलीवर बंदी घालणारे आदेश जारी केले होते. मात्र, हे प्रशासकीय आदेश केवळ कागदावरच राहिल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मूळगावी, कंधार तालुक्यातील चिखली येथे दि. २९ ऑक्टोबर रोजी मायक्रो फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीने थेट शेतकऱ्याच्या घरी जाऊन अंगणात ठिय्या मांडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

११ हप्ते भरले, १३ बाकी; दुष्काळातही तगादा चिखली येथील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल कदम यांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्यांनी आतापर्यंत नियमीत ११ हप्ते भरले असून अद्याप १३ हप्ते भरणे बाकी आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या हप्ता भरणे शक्य नसल्याचे शेतकऱ्याने स्पष्ट केले होते. तरीही, परिस्थिती समजून घेण्याऐवजी वसुली प्रतिनिधीने कदम यांच्या अंगणात बाज टाकून ठिय्या मांडला आणि वसुलीसाठी दबाव आणला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शेतकरी संघटनेचा हस्तक्षेप; प्रतिनिधीला ठणकावले या घटनेची माहिती मिळताच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक कैलास पवळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वसुली प्रतिनिधीला कडक शब्दांत जाब विचारत, शेतकऱ्यांवरील सक्तीची वसुली अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशी तंबी दिली आणि त्याला गावाबाहेर जाण्यास भाग पाडले.

प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आमदारांच्या मूळगावातच अशा प्रकारे शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असेल, तर ग्रामीण भागातील इतर सामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था असेल, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दोन निष्पाप शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतरही प्रशासन केवळ कागदी इशारे देणार की संबंधित फायनान्स कंपनीवर प्रत्यक्ष कडक कायदेशीर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!