बालहक्क, चांगला स्पर्श-असुरक्षित स्पर्श आणि बालसुरक्षेबाबत मार्गदर्शन; तालुका विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार अर्धापूर (प्रतिनिधी) – बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित बालपणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा प्राधिकरण, अर्धापूर यांच्या वतीने डॉ. इकबाल उर्दू मॉडेल हायस्कूल, अर्धापूर येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्धापूर न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती क्षितिजा लोहगावकर होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत बालहक्क, सुरक्षितता आणि स्वतःच्या संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या पत्रानुसार आयोजित या कार्यक्रमाची प्रस्तावना अॅड. सचिन देशमुख यांनी केली. प्रमुख वक्ते म्हणून पॅनल विधिज्ञ अॅड. दिलीप मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहम्मद जैद खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन पॅनल विधिज्ञ अॅड. मंगेश सरोदे यांनी केले. यावेळी अॅड. सचिन देशमुख यांनी बालसुरक्षा अभियानाचे महत्त्व विशद करताना बालपण म्हणजे निरागसता, स्वप्ने, आनंद आणि उज्ज्वल भविष्याची आशा असल्याचे सांगितले. बालपण भीती, असुरक्षितता आणि अत्याचाराच्या सावटाखाली आले, तर त्याचा परिणाम केवळ एका बालकावर नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या भविष्यावर होतो. त्यामुळे बालकांचे अधिकार, कायद्याने दिलेले संरक्षण आणि सुरक्षिततेचे महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्याला समजणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पॅनल विधिज्ञ अॅड. दिलीप मोरे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनामुळे अस्वस्थ वाटल्यास स्पष्टपणे नकार देणे, सुरक्षित ठिकाणी जाणे आणि आई-वडील, शिक्षक किंवा अन्य विश्वासू व्यक्तीला तातडीने सांगणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनुचित प्रसंग घडल्यास घाबरून न जाता मदत मागावी आणि अशा घटना लपवून ठेवू नयेत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे न्यायमूर्ती श्रीमती क्षितिजा लोहगावकर यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला थेट संवाद. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी बालसुरक्षेच्या विविध पैलूंवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. ‘चांगला स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श’ या विषयावर माहिती देताना स्वतःच्या शरीराविषयी जागरूक राहणे, अस्वस्थ करणाऱ्या स्पर्शाला विरोध करणे आणि गरज पडल्यास विश्वासू व्यक्तीची मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच परस्पर आदर, सहवेदना आणि अडचणीत असलेल्या बालकांना मदत करण्याची सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. या संवादामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शंका मांडण्याची आणि बालसुरक्षेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी अजित तरवटे, केंद्रप्रमुख विकास चव्हाण, विषय शिक्षक अब्दुल रज्जाक, मोठी दर्गा पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार घोरपडे, अर्धापूर न्यायालयाच्या ड्युटी कॉन्स्टेबल सुवर्णा निकम, न्यायालयीन कर्मचारी ऋषिकेश मगरे, अर्धापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तेदर खान पठाण, डॉ. इकबाल उर्दू मॉडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्दीकी मुशीर अहमद, शेख मकसूद लोहगावकर, मोहम्मद जैद खान, श्रीमती अमेना हयात यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. बालकांचे संरक्षण ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना अत्याचारमुक्त व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हा ‘सुरक्षित बचपन अभियान’चा मुख्य उद्देश आहे. या मार्गदर्शन शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला. Kanthak Suryatal Post Views: 97 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सारनाथ बौद्ध विहारात धम्मग्रंथ वाहनासह वर्षावास समारोप