गोदावरी नदीपात्रातील दोन स्वतंत्र कारवाया; आठ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाहे गाव परिसरात २६ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आठ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई केली. पहिली कारवाई : जेसीबीसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त वाहे गावातील गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. यावेळी चार इसम जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिसांना पाहताच संबंधित इसम घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे २५ लाख रुपये किमतीचा एक जेसीबी जप्त केला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३८९/२०२६ नुसार चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई : बोटी व इंजिनसह १ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल याच परिसरात करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले. गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे काही इसम अवैधरीत्या वाळू उपसा करत असल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनीही पळ काढला. या कारवाईत अंदाजे ३० लाख रुपये किमतीच्या तीन मोठ्या लोखंडी बोटी, १५ लाख रुपये किमतीच्या दोन लहान लोखंडी बोटी आणि ३० लाख रुपये किमतीची दोन इंजिने असा एकूण १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आल्याचे पोलीस प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३९०/२०२६ नुसार चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि इतवारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक आनंद चव्हाण तसेच पोलीस अंमलदार विजय कदम, भगवान टिपरसे, जीवन तेलंग आणि भिसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, वाळू चोरी आणि विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नदीपात्रात किंवा अन्य ठिकाणी अवैध वाळू उपसा अथवा गौण खनिज चोरी होत असल्याची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 139 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या तथागत नगरात घरफोडी; ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास