पोलीस मुख्यालयात पुष्पचक्र अर्पण; हवेत गोळ्या झाडून शहीद जवानांना मानवंदना

नांदेड (प्रतिनिधी) –  पोलीस स्मृतिदिनानिमित्त आज पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मृतिस्थळावर कर्तव्य बजावताना यंदा धारातीर्थी पडलेल्या १५४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलिसांच्या त्यागाचे स्मरण केले. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत गोळ्या झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग परिसरात सुमारे १६ हजार फूट उंचीवर गस्त घालत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर चिनी सैन्याने गोळीबार केला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्याला या दिवशी अभिवादन केले जाते.

यंदाच्या वर्षात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या १५४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या अभिवादन सोहळ्यात पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचा, त्यागाचा आणि देशसेवेच्या भावनेचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद ब्रह्मे, कुलगुरू मनोहर चासकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख, महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सूरज गुरव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या अभिवादन सोहळ्यात सहभागी झाले होते. शहीद पोलिसांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर आणि नांदगावकर यांनी या वर्षी धारातीर्थी पडलेल्या १५४ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांची नावे वाचून दाखवली.   नांदेड जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावतांना आपले प्राण गमवणाऱ्या रमेश मरगीलवर.शंकर नरवाडे आणि अशोक कांबळे यांच्या कुटुंबियांना प्रशस्ती पत्र आणि भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!