• भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश • 120 एसटी बसेस सज्ज, दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात नांदेड (जिमाका) – माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सव-2026 दरम्यान येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज यांसह सर्व आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. माहूर येथे दि. 11 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सहधर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा हिराबाई शेळके आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष किरणकुमार भोंडवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजीत जगताप, विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड, वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. माहूरगडावर भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 120 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी दिली. भाविकांच्या सुरक्षेसाठी 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार असून, गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. भाविकांना वन्यप्राण्यांपासून सुरक्षितता मिळावी यासाठी जंगल परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी सुरक्षा पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीची कामे, तर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून बंद असलेले पथदिवे नवरात्रोत्सवापूर्वी सुरू करण्यात येणार आहेत. भाविकांच्या आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालयातील 40 पैकी 20 खाटा यात्रा व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुरेसा औषधसाठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असून, दत्तशिखर, अनुसया माता व रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी आरोग्य पथके आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, सुलभ दर्शन रांगा तसेच परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद, साबुदाणा खिचडी व फळांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगरपंचायतीतर्फे दत्त चौक येथील नियंत्रण कक्ष, पाणी, पथदिवे आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दत्तशिखर संस्थानतर्फे पाणी, स्वच्छता, वीज, महाप्रसाद तसेच संस्थानच्या जागेत मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा करण्याची ग्वाही देण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या आरोग्य, सुरक्षा, वाहतूक व इतर आवश्यक सुविधांसाठी विविध विभागांचे दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, पुरातत्त्व विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुखांच्या बैठकीतील अनुपस्थितीची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गांभीर्याने नोंद घेतली. शारदीय नवरात्रोत्सवासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संस्थान सज्ज झाले असून, भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत राहणार आहेत. भाविकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे व शिस्तीचे पालन करून निर्धास्तपणे माहूरगडावर यावे आणि श्री रेणुकामातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासन व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 73 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिल्लीतील आंदोलनात खा. राहुल गांधींच्या संवेदनशीलतेचे दर्शन; गर्दीत अडकलेल्या खा. इक्रा हसन यांच्यासाठी बनले ढाल कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही जिल्हा परिषद शिक्षक गृहनिर्माण संस्थेच्या जागेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार