नांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कायदेपालन आणि कारवाईच्या अजोड तत्परतेचा एक अनोखा नमुना सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही, सुधाकर टाक यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि बळजबरीने रस्ता व नाली बांधण्यासाठी मनपाचे अधिकारी मोठा लवाजमा घेऊन धावून जातात. कायद्याचा असा प्रचंड बडगा दाखवणाऱ्या या शूर मनपा प्रशासनाला अगदी शेजारीच असलेल्या स्मार्ट बाजारजवळील गायब झालेला पादचारी रस्ता मात्र का दिसत नसेल, असा खोचक प्रश्न आता उपस्थित होत आहे. अंबानींच्या आस्थापनापुढे प्रशासकीय चष्मा आंधळा? देशात अंबानी कुटुंबीयांच्या कोणत्याही आस्थापनावर किंवा चुकीच्या कृत्यावर कारवाई करण्याची हिंमत एकाही अधिकाऱ्यात नाही, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. एखाद्या गरीब माणसाने किंवा लहान फेरीवाल्याने स्वतःची उपजीविका चालवण्यासाठी पादचारी रस्त्यावर एक छोटा स्टूल किंवा छोटे दुकान थाटले, तर मनपाचे पथक अत्यंत तत्परतेने तो स्टूल उचलून नेण्यात अजिबात वेळ दवडत नाही. परंतु, येथे तर चक्क संपूर्ण पादचारी रस्ताच गायब करून त्यावर स्मार्ट बाजार मोठ्या थाटात सुरू करण्यात आला आहे, तरीही मनपाच्या अतिदक्ष डोळ्यांना ते दिसत नाही! मुख्य रस्त्यावर पार्किंगचा थाट आणि मनपाची निद्रा! गायब केलेल्या या पादचारी रस्त्याचा वापर आता सर्रास वाहनतळ किंवा पार्किंग म्हणून केला जात आहेच; शिवाय त्याच्याही पुढे जाऊन मुख्य रस्त्यावरच दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. गरीब व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महानगरपालिकेचे या बेकायदेशीर पार्किंगकडे आणि गायब झालेल्या रस्त्याकडे मात्र अजिबात लक्ष जात नाही. नागरिकांनीच द्यावा जागृतीचा धक्का! छोट्या घटकांवर तात्काळ कारवाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या या उघड दुटप्पी धोरणावर आणि प्रशासकीय दुजाभावावर आता नांदेडच्या सर्व नागरिकांनीच एकत्र येऊन सवाल विचारण्याची वेळ आली आहे. जेव्हा नांदेडचे नागरिक यावर जाब विचारतील, तेव्हाच बहुदा या महानगरपालिकेला जाग येईल आणि हा गायब झालेला पादचारी रस्ता शोधण्यासाठी प्रशासन काहीतरी हालचाल करेल, अशी उपरोधिक परिस्थिती आज निर्माण झाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 123 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भविष्यातही पोलीस दल पाठीशी – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप ज्ञानेश कुमार यांची मोठी हार! निवडणूक आयोगाचे थेट सरेंडर; SIR मधील महाघोटाळा उघडकीस येताच २० राज्यांत नवा आदेश!