कर्तव्याची सांगता अन् नव्या प्रवासाची सुरुवात: नांदेड पोलीस दलातर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावूक निरोप नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रदीर्घ काळ निष्ठापूर्वक, अहोरात्र सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव आणि निरोप समारंभ मंथन हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात पार पडला. पोलीस दलातर्फे ३० सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यात सेवापूर्ती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सहपरिवार यथोचित सन्मान करून निरोप देण्यात आला. आता मनासारखे जगा, कुटुंब आणि आरोग्याला वेळ द्या या सोहळ्यात मार्गदर्शन करताना पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या त्यागाचा व योगदानाचा विशेष गौरव केला. ते म्हणाले की, पोलीस दलात काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वरिष्ठांचे आदेश तंतोतंत पाळणे, कनिष्ठ कर्मचारी ऐकतात की नाही याची चिंता करणे, आणि २४ तास कर्तव्यावर असल्यामुळे कुटुंबाला, पाल्यांना अथवा नातलगांना पुरेसा वेळ देता न येणे ही मोठी आव्हाने असतात. अनेकदा आनंदाच्या प्रसंगात वा दुःखाच्या प्रसंगातही हजर राहता येत नाही. परंतु, या सर्व कौटुंबिक व सामाजिक त्यागातून मार्ग काढत तुम्ही आपली सेवा अत्यंत निष्ठेने पूर्ण केली आहे. पुढे बोलताना त्यांनी दिलासा दिला की, आता तुम्हाला तुमच्या मनासारखे जगण्याची आणि कुटुंबाला वेळ देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. भविष्यातील जीवनात काही अडचणी आल्यास मी आणि माझे नांदेड पोलीस दल तुमच्या मदतीसाठी सदैव पाठीशी उभे राहू. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती व सत्कार या सोहळ्यास प्रभारी पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्यासह विविध शाखांचे प्रभारी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून भावी आयुष्यासाठी उदंड आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सेवानिवृत्त झालेल्या ८ पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे: निरोप समारंभात खालील ८ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार करण्यात आला: १. पोलीस उपनिरीक्षक देविदास बापुराव भिसाडे – पोलीस निरीक्षक कक्ष २. पोलीस उपनिरीक्षक उत्तम माधवराव डोईफोडे – पोलीस निरीक्षक कक्ष ३. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिलीप रामचंद्र भंडारे – शहर वाहतूक शाखा, नांदेड ४. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिलसिंग किशनसिंग बयास – पोलीस ठाणे, नांदेड ग्रामीण ५. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मो. अन्वर मो. इस्माईल – पोलीस मुख्यालय, नांदेड ६. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल किशनसिंग राठोड – गुन्हे शोध शाखा, नांदेड ७. चालक साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशन दगडु राठोड – पोलीस ठाणे, सिंदखेड ८. पोलीस हवालदार रामसिंग जयपालसिंग बयास – पोलीस मुख्यालय, नांदेड हा कार्यक्रम सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत स्मरणीय व प्रेरणादायी ठरला. Kanthak Suryatal Post Views: 16 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ना गणवेशावर बॅज, ना ओळखपत्र! पत्रकारांना आणि सामान्य नागरिकांना पोलिसांकडून बळजबरीने गाडीत कोंडले; जंतर-मंतरवर कर्फ्यूसारखी परिस्थिती!