माझा नवा जन्म झाला आहे असे मी मानतो. हिंदू धर्मात पुनर्जन्म म्हणजे मेल्यानंतर दुसऱ्या योनीत जन्म घेणे. पण बाबासाहेब इथे पुनर्जन्माचा अर्थच बदलून टाकतात.ते म्हणतात, माझा पुनर्जन्म मेल्यानंतर नाही, तर जिवंतपणीच झाला आहे. ही प्रतिज्ञा सांगते की, जो माणूस कालपर्यंत हिंदू धर्मात होता, ज्याला अस्पृश्य, महार, मांग, चांभार म्हणून हिनवले जायचे, ज्याला गावाबाहेर राहावे लागायचे, जो मान खाली घालून चालायचा – तो माणूस आज मेला. त्याचे नाव, त्याची जात, त्याचा अपमान, त्याची गुलामगिरी – सगळे आज दीक्षाभूमीवर जळाले. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही जुन्या धर्मात मेलात, म्हणूनच तुम्ही नवीन धर्मात जन्म घेऊ शकलात. आजपासून जन्मलेला माणूस हा स्वतंत्र आहे, समान आहे, स्वाभिमानी आहे. त्याला आता कोणाचीही भीती नाही. त्याला आता कोणत्याही जातीचा शिक्का नाही. तो आता फक्त बौद्ध आहे – प्रज्ञा, शील, करुणेने जगणारा माणूस. बाबासाहेबांनी स्वतःचे उदाहरण दिले – मी पूर्वी अस्पृश्य होतो, आता मी बौद्ध झालो. माझा नवा जन्म झाला. आता मला कोणीही अस्पृश्य म्हणू शकत नाही. ही प्रतिज्ञा मानसशास्त्रीय अधिष्ठान असलेली अत्यंत मजबूत अशी प्रतिज्ञा आहे. जर तुम्ही मनातूनच मानले नाही की मी बदललो आहे, तर जग तुम्हाला बदलू देणार नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात, आधी स्वतःच्या मनाला सांगा – मी बदललो आहे. मी आता जुना राहिलो नाही. तुम्ही जेव्हा हॉटेलात जाता, तेव्हा तुम्ही सांगता का की मी अस्पृश्य आहे? नाही. कारण तुम्ही मानता की माझा नवा जन्म झाला आहे. हीच खरी मुक्ती आहे. मी आजपासून माझा भूतकाळ, माझा न्यूनगंड, माझी लाचारी सोडून देतो. मी आजपासून एका नव्या माणसासारखा जगेन – ज्याचे डोके उंच असेल, ज्याची छाती ताठ असेल आणि ज्याच्या मनात भीती नसेल. हा माझा पुनर्जन्म आहे. पुढची प्रतिज्ञा या नव्या जन्माची शपथच आहे. मी आजपासून बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. १९ व्या प्रतिज्ञेत धर्म बदलला, विसावी प्रतिज्ञा जन्म बदलते आणि आता एकविसाव्या प्रतिज्ञेत बाबासाहेब आयुष्य बदलण्याची शपथ देतात. ही प्रतिज्ञा म्हणजे एक वचननामा आहे. आतापर्यंत बाबासाहेबांनी काय करू नये हे सांगितले – चोरी नको, खोटे नको, दारू नको. आता ते सांगतात की काय करावे. बुद्धाने सांगितले – माझेही ऐकू नका, जोपर्यंत तुमच्या बुद्धीला ते पटत नाही. मी अंधभक्त बनणार नाही, मी चिकित्सक बनेन अशीही अपेक्षा आहे. बुद्धाने देव नाही, तर माणूस केंद्रस्थानी ठेवला. मी आता कोणत्याही देवाला प्रसन्न करण्यासाठी जगणार नाही, तर माणसाचे दुःख दूर करण्यासाठी जगेन,असे लक्षात आले पाहिजे. बुद्धाची शेवटची शिकवण होती – दुसऱ्या कोणाच्या भरवशावर राहू नका. स्वतःच स्वतःचा आधार व्हा. म्हणून मी आता कोणत्याही पुजारी, भटजी किंवा कोणत्याही महाराजांकडे माझ्या मुक्तीसाठी जाणार नाही. माझी मुक्ती माझ्याच हातात आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात बुद्धाची शिकवणूक तीनच शब्दांत सांगितली आहे – समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. हिंदू धर्मात विषमता, पारतंत्र्य आणि द्वेष होता. बौद्ध धम्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आहे. मी आजपासून माझे जुने विचार, जुने संस्कार, जुनी गुलामगिरी सोडून, बुद्धाने दाखवलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रज्ञा, शील, करुणा या मार्गावर चालेन. मी फक्त तोंडाने बौद्ध म्हणणार नाही, तर आचरणाने बौद्ध होईन. ही माझी स्वतःला दिलेली शपथ आहे आणि यानंतर येते शेवटची, २२ वी प्रतिज्ञा जी सर्व प्रतिज्ञांचा कळस आहे. बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. ही शेवटची प्रतिज्ञा नाही, तर पहिल्या २१ प्रतिज्ञांचे कारण आहे. बाबासाहेबांनी याआधी २१ प्रतिज्ञा का दिल्या? कारण त्यांना खात्री पटली होती की फक्त बुद्धाच धम्म खरा आहे, चांगला आहे, माणसाला माणूस बनवणारा आहे. त्यालाच सद्धम्म म्हणतात. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथात सांगितले आहे की एखादा धम्म सद्धम्म कधी होतो, त्याचे ६ नियम आहेत. बुद्ध धम्मच या ६ कसोट्यांवर खरा उतरतो: अ) माणसाला बुद्धीला पटणारा धम्मच सद्धम्म असतो: बुद्ध धम्म तुम्हाला सांगत नाही – डोळे बंद करून विश्वास ठेवा. तो म्हणतो – डोळे उघडा, प्रश्न विचारा, आणि मगच स्वीकारा. हा प्रज्ञेचा धम्म आहे. आ) माणसाला स्वतंत्र करणारा धम्मच सद्धम्म असतो: हिंदू धर्माने सांगितले – तू शूद्र आहेस, तू गुलामच राहणार. बुद्ध धम्म म्हणतो – तू स्वतःच तुझा मालक आहेस. अत्त दीप भव हा स्वातंत्र्याचा धम्म आहे. इ) माणसा-माणसात समता शिकवणारा धम्मच सद्धम्म असतो: बुद्ध धम्मात कोणी ब्राह्मण नाही, कोणी शूद्र नाही. सगळे समान. बुद्धाने भिक्खू संघात अस्पृश्यालाही घेतले आणि राजालाही. दोघे एकाच रांगेत बसायचे. हा समतेचा धम्म आहे. ई) माणसाला नैतिक बनवणारा धम्मच सद्धम्म असतो: बुद्ध धम्म तुम्हाला सांगतो – चांगले वागा, पंचशील पाळा, अष्टांगिक मार्गाने चला. तो तुम्हाला मोक्षाचे आमिष दाखवत नाही, तर या जन्मातच चांगले कसे जगावे हे शिकवतो. हा शीलाचा धम्म आहे. उ) माणसावर प्रेम करायला शिकवणारा धम्मच सद्धम्म असतो: बुद्ध धम्मात द्वेष नाही. मैत्री आहे, करुणा आहे. सब्बे सत्ता सुखी होंतु – सर्व प्राणी सुखी होवोत. हा करुणेचा धम्म आहे. ऊ) माणसाचे दुःख नष्ट करणारा धम्मच सद्धम्म असतो: बुद्धाने चार आर्य सत्य सांगितले – दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःख दूर होऊ शकते, आणि त्याचा मार्ग आहे. बुद्ध धम्म तुम्हाला दुःखातून बाहेर काढतो. हा मुक्तीचा धम्म आहे. मी अनेक धर्म पाहिले, अनेक धर्मांचा अभ्यास केला, पण मला माणसाला माणूस म्हणून जगवणारा, बुद्धीला पटणारा, समता-स्वातंत्र्य-बंधुता देणारा एकच धम्म दिसला तो म्हणजे बुद्ध धम्म. आणि तोच खरा सद्धम्म आहे. म्हणून मी आजपासून आणि जन्मभर याच सद्धम्माचे पालन करीन. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आम्हाला फक्त बौद्ध केले नाही, तर माणूस म्हणून नवा जन्म दिला. परंतु या प्रतिज्ञा न पाळणारे गद्दार बौद्ध जिथे असतील तिथे त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. या प्रतिज्ञांमधील पहिल्या काही प्रतिज्ञांमध्ये कोणत्याही हिंदू देव-देवतांची पूजा न करणे आणि अवतारवादावर विश्वास न ठेवणे या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. जे लोक हिंदू धर्माचे पालन करतात, ते त्यांच्या धार्मिक श्रद्धांमुळे या प्रतिज्ञा पाळत नाहीत आणि ते त्यांच्यासाठी बंधनकारकही नाहीत.बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही काही व्यक्ती किंवा कुटुंबे कौटुंबिक दबावामुळे, जुन्या सवयींमुळे किंवा सांस्कृतिक प्रभावामुळे पूर्णपणे जुन्या रूढी-परंपरा सोडू शकत नाहीत. हे लोक स्वतःला बौद्ध मानतात, परंतु नकळतपणे किंवा सामाजिक दबावापोटी २२ प्रतिज्ञांचे १००% काटेकोर पालन करत नाहीत. अनेकदा लोकांना असे वाटते की २२ प्रतिज्ञा म्हणजे केवळ हिंदू देव-देवतांना न मानणे हेच आहे. परंतु, या प्रतिज्ञांमध्ये चोरी न करणे, खोटे न बोलणे, व्यसनाधीन न होणे, प्राणिमात्रांवर दया करणे आणि समता प्रस्थापित करणे यांसारखी महत्त्वाची नैतिक मूल्येही आहेत. अनेक लोक वैयक्तिक जीवनात या नैतिक मूल्यांचे उल्लंघन करतात, ज्यामुळे ते प्रतिज्ञांचे पूर्ण पालन करू शकत नाहीत. या प्रतिज्ञा प्रामुख्याने हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश करणाऱ्या नवयानी बौद्धांसाठीच तयार केल्या होत्या. त्यामुळे इतर धर्मातील लोक आपापल्या धार्मिक नियमांचे पालन करतात आणि या प्रतिज्ञा पाळत नाहीत. जगात कोणत्याही धर्माचे किंवा नैतिक प्रणालीचे सर्वच लोक १००% पालन करतात असे नाही. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो माणसाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा एक सामाजिक कार्यक्रम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करणे किंवा न करणे, तसेच या प्रतिज्ञांच्या सार्वजनिक उच्चारावरून समाजात अनेकदा मोठे वाद-विवाद आणि राजकीय संघर्ष निर्माण झाले आहेत. हे वाद प्रामुख्याने प्रतिज्ञांमधील हिंदू देव-देवतांचा उल्लेख आणि सामाजिक – राजकीय संदर्भांमुळे उद्भवतात. उजव्या विचारसरणीच्या आणि पारंपरिक हिंदू संघटनांचा असा आक्षेप असतो की, नवीन धर्म स्वीकारताना स्वतःच्या तत्त्वांचा प्रसार करावा, परंतु दुसऱ्या धर्माच्या देवांचा किंवा परंपरेचा स्पष्ट शब्दांत निषेध करणे किंवा “पूजा करणार नाही” असे जाहीरपणे म्हणणे हे धार्मिक सलोख्याला बाधा आणणारे आहे,असे काहींचे म्हणणे आहे. बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा कोणाचा अपमान करण्यासाठी नव्हे, तर अस्पृश्यता आणि विषमतेचे मूळ ज्या धार्मिक संकल्पनांमध्ये आहे, त्यातून लोकांना पूर्णपणे मुक्त करण्यासाठी दिल्या होत्या. जुन्या धार्मिक संकल्पना पूर्णपणे सोडल्याशिवाय व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही, हा यामागचा मूळ हेतू आहे. अनेक नवबौद्ध कुटुंबांमध्ये लग्नकार्यात किंवा सणांच्या वेळी काही जुन्या हिंदू चालीरिती पाळल्या जातात. अशा वेळी समाजातील कट्टर आंबेडकरी कार्यकर्ते आणि सुधारक यांच्यात वाद होतात. प्रतिज्ञांचे १००% पालन न करणाऱ्यांना “अजूनही जुनी मानसिक गुलामगिरी सोडलेली नाही” असे म्हणून टीका केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञांमधील सुरुवातीच्या प्रतिज्ञा स्पष्टपणे सांगतात की, बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीने इतर कोणत्याही हिंदू धर्मीय देव-देवता किंवा संतांची धार्मिक उपासना करू नये. राजकीय बौद्ध नेते हे आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करत असल्याने, त्यांनी जाहीरपणे मंदिरात जाऊन पूजा करणे हे २२ प्रतिज्ञांचे थेट उल्लंघन आहे, असा आक्षेप आंबेडकरी कार्यकर्ते घेत असतात. एखाद्या बौद्ध कुटुंबात लग्न ठरताना, जर मुलाकडचे किंवा मुलीकडचे लोक २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पालन करणारे असतील, तर ते लग्नात वधू वरांकडून बावीस प्रतिज्ञा वदवून घ्याव्यात, असा आग्रह धरतात.परंतु या समारंभाला विविध जाती धर्माचे लोक येतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून नकार देतात. ज्यामुळे लग्नमंडपातच मोठे कौटुंबिक वाद निर्माण होतात. असे काही ठिकाणी घडले आहे. बायको हिंदू आहे म्हणून किंवा आई वडील जुन्या विचारांचे आहेत म्हणूनही देवदेवता पुजल्या जातात. गाव खेड्यात सर्वच सण उत्सव साजरे केले जातात. तो गावगाड्याचा आणि अज्ञानाचाही प्रभाव असतो. अंत्यविधीच्या पद्धतीत बौद्ध धम्मात मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना केवळ त्रिशरण-पंचशील आणि धम्मवंदना घेतली जाते. परंतु, काही कुटुंबांमध्ये नातेवाईकांच्या दबावामुळे ‘पिंडदान’ किंवा ‘१३ वा दिवस पाळणे’ यांसारख्या वैदिक प्रथा केल्या जातात. अशा वेळी स्थानिक आंबेडकरी संघटना किंवा तरुण कार्यकर्ते तिथे जाऊन विरोध करतात, ज्यामुळे अनेकदा समाजात तेढ निर्माण होते. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा केवळ वैयक्तिक आचरणाचा भाग राहिलेल्या नसून, त्या आंबेडकरी समाजाच्या वैचारिक अस्मितेचे एक अत्यंत संवेदनशील प्रतीक बनलेल्या आहेत. २२ प्रतिज्ञा घेण्यावर किंवा त्यांचे वाचन करण्यावर भारतात कोणतीही कायदेशीर बंदी नाही.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ज्यांच्या अंतर्गत या प्रतिज्ञा पूर्णपणे कायदेशीर ठरतात. भारतीय न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत एखादी व्यक्ती शांततापूर्ण मार्गाने आपल्या धार्मिक अधिकारांचा वापर करत आहे आणि हिंसेला चिथावणी देत नाही, तोपर्यंत तिच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे की, केवळ स्वतःच्या धार्मिक श्रद्धा व्यक्त करणे किंवा विशिष्ट देवांची पूजा न करण्याची प्रतिज्ञा घेणे म्हणजे दुसऱ्या धर्माचा अपमान किंवा द्वेष पसरवणे नव्हे. त्यामुळे अशा तक्रारी बहुतांश वेळा न्यायालयात टिकत नाहीत.२२ प्रतिज्ञा घेणे हा पूर्णपणे कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार आहे. कायदा कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक आयुष्यात विशिष्ट देवांची पूजा न करण्याची किंवा जुन्या रूढी सोडण्याची मुभा देतो. परंतु, सार्वजनिक शांतता भंग होणार नाही आणि सामाजिक सलोखा राखला जाईल, अशा पद्धतीने या अधिकारांचा वापर करावा लागतो. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. – पज्ञाधर ढवळे, नांदेड. मो. 9890247953. Kanthak Suryatal Post Views: 73 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचा अन्वयार्थ- भाग दोन युद्ध तिथे, महागाई इथे।