नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड शहरातील जुना कौठा परिसरात घडलेल्या बहुचर्चित इंद्रजितसिंग बावरी हत्या प्रकरणात आणि संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या धडक कारवाईअंतर्गत, अटकेत असलेला आरोपी मुंजाजी उर्फ गब्बा धोंडगे यास विशेष न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश तुषार आगलावे यांनी पोलीस तपासाची गरज आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. या महत्त्वपूर्ण सुनावणीत सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट यादव तळेगावकर यांनी अत्यंत प्रभावी व कायदेशीर बाजू मांडली. गुन्ह्याची पार्श्वभूमी व थरारक घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा येथे ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.०० ते १.३० वाजेच्या सुमारास ही भीषण घटना घडली होती. फिर्यादी मनजितसिंग किशनसिंग बावरी (वय २३, रा. संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा चुलत भाऊ इंद्रजितसिंग बलजितसिंग बावरी (वय २५) याच्यावर पूर्ववैमनस्य आणि फायनान्सच्या वाहनांच्या वसुलीवरून झालेल्या वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. के.बी. गँगचे प्रमुख कैलास बिगानिया व नितीन बिगानिया यांच्या सांगण्यावरून टोळीतील सदस्यांनी तलवार, खंजीर व काठ्यांसारख्या प्राणघातक शस्त्रांनी इंद्रजितसिंग यांच्यावर अमानुष वार केले. गंभीर जखमी झालेल्या इंद्रजितसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. के.बी. गँगवर मकोकाची कडक कारवाई तपासादरम्यान समोर आले की, कैलास बिगानिया आणि नितीन बिगानिया यांची ‘के.बी. गँग’ नांदेड शहर व परिसरात संघटित गुन्हेगारी कृत्य करत असून, टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी खंडणी उकळणे, मारामारी, धमक्या देणे व खून करणे असे गंभीर गुन्हे करत होती. या टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांना चाप लावण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांच्या मंजुरीने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मकोका) चे कलम ३(१)(i), ३(२), ३(४) समाविष्ट करण्यात आले. आरोपी मुंजाजी धोंडगे याचा गुन्ह्यातील सहभाग या गुन्ह्याच्या तपासात आरोपी मुंजाजी उर्फ गब्बा धोंडगे (वय २४ वर्ष, रा. रविनगर, जुना कौठा, नांदेड) हा के.बी. गँगचा सक्रिय सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी व दहशतीसाठी गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी मुंजाजी उर्फ गब्बा यास शिताफीने अटक करून विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ॲड. यादव तळेगावकर यांचा कोर्टातील जोरदार युक्तिवाद न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट यादव तळेगावकर यांनी पोलीस कोठडीची मागणी करताना खालील महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे न्यायाधीशांसमोर मांडले: गुन्ह्याचे गांभीर्य: हा गुन्हा केवळ वैयक्तिक वादातून नसून संघटित गुन्हेगारी टोळीने समाजात दहशत निर्माण करण्यासाठी केला आहे. तपासात असहकार: आरोपी मुंजाजी उर्फ गब्बा धोंडगे हा चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी करणे आवश्यक आहे. मुद्देमाल जप्ती: गुन्ह्यात वापरलेली घातक शस्त्रे, भ्रमणध्वनी (मोबाईल) व इतर पुरावे हस्तगत करणे बाकी आहे. फरार आरोपींचा शोध: या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व फरार आरोपी नितीन जगदिश बिगानिया आणि कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंग परदेशी यांच्या ठावठिकाण्याबाबत आरोपीकडून माहिती मिळवणे गरजेचे आहे. खंडणी व आर्थिक पाळेमुळे: के.बी. गँगने शहरातील व्यापाऱ्यांकडून उकळलेली खंडणी व त्यातून मिळवलेल्या बेकायदेशीर आर्थिक फायद्याचा तपास करण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी होणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहे. न्यायालयाचा निर्णय व पुढील तपास विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट यादव तळेगावकर यांचा सर्वसमावेशक युक्तिवाद आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेडरे यांनी दाखल केलेला पोलीस कोठडी रिमांड अर्ज ग्राह्य धरून, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश तुषार आगलावे यांनी आरोपी मुंजाजी उर्फ गब्बा धोंडगे यास पोलीस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेद्रे व सहायक पोलीस निरीक्षक बी. पी. गायकवाड करत आहेत. या पोलीस कोठडीमुळे के.बी. गँगच्या नेटवर्कबद्दल व फरार आरोपींबद्दल महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 26 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation युपीआय आता मोफत राहणार नाही? २,००० रुपयांवरील व्यवहारांवर शुल्काची टांगती तलवार!