स्थानिक पोलिसांसह बाहेरून अतिरिक्त कुमक दाखल; १,५७५ होमगार्ड तैनात नांदेड (प्रतिनिधी) :- गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी व्यापक सुरक्षा नियोजन केले आहे. स्थानिक पोलीस दलासोबतच राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अतिरिक्त मनुष्यबळ नांदेड जिल्ह्यात दाखल झाले असून, उत्सव काळात संवेदनशील भाग, प्रमुख गणेश मंडळे, विसर्जन मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या स्थानिक मनुष्यबळात २ अपर पोलीस अधीक्षक, ११ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३१ पोलीस निरीक्षक, १८२ पोलीस उपनिरीक्षक/सहायक पोलीस निरीक्षक आणि २ हजार ६५७ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय बाहेरून २ पोलीस उपअधीक्षक, ६ पोलीस निरीक्षक/महिला पोलीस निरीक्षक, १० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, ५० महामार्ग पोलीस अंमलदार, १०० प्रशिक्षणार्थी अंमलदार आणि गडचिरोली येथून एसआरपीएफची एक कंपनी दाखल झाली आहे. उत्सव काळात अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून तब्बल १ हजार ५७५ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये १ हजार ३०० पुरुष आणि २७५ महिला होमगार्डचा समावेश आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य गर्दीची ठिकाणे, प्रमुख विसर्जन मार्ग तसेच मोठ्या गणेश मंडळांच्या परिसरात महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. स्थानिक महिला पोलीस कर्मचारी, बाहेरून आलेल्या २५ महिला प्रशिक्षणार्थी आणि २७५ महिला होमगार्ड यांच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार आहे. वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर गणेशोत्सवाच्या काळात शहरासह महामार्गांवर भाविक आणि वाहनांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. ५० महामार्ग पोलीस अंमलदारांसह स्थानिक वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियमन केले जाणार आहे. संवेदनशील भागात २४ तास पहारा संवेदनशील भागांमध्ये एसआरपीएफच्या एका कंपनीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलिंग पथके तैनात केली जाणार आहेत. फिक्स पॉईंट आणि नाकाबंदीच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेवर २४ तास नजर ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्याचे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 142 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा पोलीस दलाची ७८ वर्षे: ज्युलियस रिबेरोंपासून ते आजपर्यंतचा देदीप्यमान प्रवास!