नांदेड (प्रतिनिधी) – १४ सप्टेंबर १९४८ रोजी स्थापन झालेल्या नांदेड जिल्हा पोलीस दलाला आज तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्प्यावर वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने नांदेड पोलीस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून भविष्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हार्दिक शुभकामना देण्यात आल्या आहेत. आज श्री स्थापनेच्या दिवशी,१४ सप्टेंबर रोजी पोलीस दलाच्या स्थापना दिनाचे ७८ वर्षे पूर्ण झाले असून, या प्रदीर्घ प्रवासाच्या काळात शहराने ४० पेक्षा जास्त पोलीस अधीक्षक पाहिले आहेत. नांदेड जिल्ह्याचे सर्वात पहिले पोलीस अधीक्षक म्हणून ज्युलियस रिबेरो यांनी धुरा सांभाळली होती. ७८ वर्षांच्या या गौरवशाली कार्यकाळात पोलीस दलात झालेले प्रशासकीय बदल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी ठरले आहेत. बदलती आव्हाने आणि वाढती लोकसंख्या ७८ वर्षांपूर्वीचा काळ आणि आजची सद्यस्थिती यांचा विचार केला तर पोलीस प्रशासनापुढील आव्हानांमध्ये मोठे बदल घडल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळात एका पोलिसाचा शब्द हजारोंची गर्दी, गट किंवा जमाव शांतपणे ऐकत असे. परंतु आजच्या आधुनिक काळात पोलिसांचा मोठा ताफा किंवा फौजफाटा तैनात असला तरी जमाव बोलू लागला आहे. त्यामुळे या परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी एका नियोजनबद्ध आखणीची नितांत गरज निर्माण झाली असून पोलिसांमध्ये काही मोठे आणि अमूलाग्र बदल होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सध्याच्या आकडेवारीचा आणि संख्याबळाचा आढावा घेतल्यास, नांदेड जिल्हा पोलीस दलात आज ३,७०० पोलिसांची संख्या मंजूर आहे. यासोबतच ५०० पेक्षा जास्त अधिकारी नांदेड जिल्ह्याच्या मंजूर संख्येत समाविष्ट आहेत. दुसरीकडे, जिल्ह्याची लोकसंख्या आज तब्बल २४ लाखांवर पोहोचली आहे. पोलिसांची संख्या आणि जनतेची लोकसंख्या यांच्या तुलनेत प्रत्यक्षात किती पोलीस कर्मचारी हवेत, यासंदर्भात मागे एक महत्त्वाचा सर्व्हे जाहीर करण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने त्या सर्व्हेच्या मानकांनुसार आजही कोणत्याच जिल्ह्यात किंवा कोणत्याही महानगरात पोलिसांची संख्या त्या प्रमाणाशी जुळणारी नाही. कर्तव्य, सुट्ट्या आणि पदरचनेतील बदल नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अहोरात्र कष्ट उपसत असतात. इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना आठवड्याला मिळणारी शनिवारची सुट्टी पोलिसांना मात्र मिळत नाही, किंवा त्या सुट्टीबद्दलचा कोणताही अतिरिक्त मोबदलाही त्यांना दिला जात नाही. आपल्या या हक्काच्या सुट्टीसाठी आणि मोबदल्यासाठी पोलिसांची न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे, परंतु अजूनही न्यायालयाकडून त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. याव्यतिरिक्त, गेल्या ७८ वर्षांत पोलीस दलातील विविध पदांच्या रचनेतही काही महत्त्वाचे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. पूर्वी पोलीस नाईक हे पद नव्याने तयार करण्यात आले होते, परंतु काळाच्या ओघात आता हे पद समाप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हे नवीन पद दलात तयार करण्यात आले असून आजही या पदावर नियमित काम चालू आहे. सक्षम नेतृत्व आणि माफियांवर वचक नांदेड जिल्हा पोलीस दलाला नेहमीच खंबीर आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. आजघडीला नांदेडच्या पोलीस अधीक्षक या वरिष्ठ पदावर डॉ. नीलाभ रोहन अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत. तसेच पूर्वी काही वर्षे नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावलेले शहाजी उमाप हे सध्या नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक (IG) या जबाबदार पदावर कार्यरत आहेत. या दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासाला आणि तक्रारींना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम वेगाने केले जात आहे. जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी चालणार नाही, असा सडेतोड इशारा प्रशासनाने दिला आहे. कोणताही वाळूमाफिया, भू-माफिया, खंडणी माफिया किंवा कोणत्याही प्रकारचा माफिया नांदेड जिल्ह्यात मान उंच करून चालू नये, यासाठी पोलीस दलाकडून कडक पावले उचलली जात आहेत. जनतेचा विश्वास आणि भविष्यातील ध्येय पोलीस प्रशासनाचा मुख्य उद्देश म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस दलाबद्दल जास्तीत जास्त प्रेमाची, आपुलकीची व विश्वासाची भावना निर्माण करणे हा आहे. पोलिसांमधील अंतर्गत आव्हानांवर मात करत पोलीस दल सदैव तत्पर आहे. ७८ वर्षांची ही प्रदीर्घ सेवेची परंपरा पुढे नेताना, वाढती लोकसंख्या आणि नवनवीन आव्हानांना सामोरे जात नांदेड पोलीस दल निष्ठेने कार्यरत राहील. वास्तव न्यूज लाईव्हकडून नांदेड पोलीस दलाला पुढील सर्व यशस्वी वाटचालीसाठी पुनःश्च मनःपूर्वक शुभेच्छा! Kanthak Suryatal Post Views: 149 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ताशांचा खडकडाट आणि उत्साही वातावरण; नांदेड जिल्हाभरात श्री गणेशाचे आगमन! गणेशोत्सवासाठी नांदेड पोलिसांचा चोख बंदोबस्त