मूकबधिर युवकाने टॉवरवरून विवाहाचे बॅनर दाखवत व्यक्त केल्या भावना; यापूर्वीही केले होते असे आंदोलन
लोहा(प्रतिनिधी)-पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरून जावयाने चक्क सुमारे 200 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केल्याची घटना सोमवारी (7 सप्टेंबर) सकाळी लोहा शहरातील बसस्थानक परिसरात घडली. शादुल शेख (रा. बेटमोगरा, ता. मुखेड) असे टॉवरवर चढलेल्या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही शादुलने टॉवरवर चढून अशाच प्रकारे आंदोलन केल्याची माहिती आहे.
शादुल आणि त्याची पत्नी दोघेही मूकबधिर आहेत. पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिला नांदायला पाठविण्यासाठी नातेवाईकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज झालेल्या शादुलने सोमवारी सकाळी आठच्या सुमारास मोबाईल टॉवर गाठला. आत्महत्या करण्याची धमकी देत तो टॉवरवर चढला.
टॉवरवर चढल्यानंतर शादुलने विवाहाचे बॅनर हातात धरून आपल्या भावना व्यक्त केल्या. पत्नीला पुन्हा नांदायला पाठवावे, तसेच संसार सुरळीत व्हावा, असा संदेश त्याने बॅनरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खाली उपस्थित असलेल्या नागरिकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिस आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शादुलने पत्नीशी व्हॉट्सप कॉलद्वारे संवाद साधला. पोलिस व नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर पत्नीला नांदायला पाठविण्याबाबत आश्वासन मिळाल्याने तब्बल एक तासानंतर तो टॉवरवरून सुखरूप खाली उतरला.
या घटनेमुळे बसस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती. अनेक तरुणांनी मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरण करून रिल्स तयार केल्या. लाडाचा जावई टॉवरवर चढला अशी चर्चा परिसरात रंगली होती. घटनास्थळी लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद घोडके, पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
