मुखेड भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा सापळा; १५ हजारांची लाच घेताना शिपाई रंगेहात ताब्यात, निमतानदारावरही गुन्हा दाखल!

शेतजमीन मोजणी अहवालासाठी १५ हजारांची लाच घेणारा मुखेड भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई एसीबी’च्या जाळ्यात; निमतानदाराविरुद्धही गुन्हा दाखल 

मुखेड (प्रतिनिधी) –  न्यायालयात शेतजमिनीच्या मोजणीचा अहवाल पाठवण्यासाठी १५,००० रुपयांची लाच घेताना मुखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विवेकानंद पांडुरंग खुडे (वय ३५ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या लाच प्रकरणात शिपायासोबतच कार्यालयातील निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मुखेड पोलीस ठाण्यात सुरू आहे.

तक्रारीची पार्श्वभूमी: या प्रकरणातील ७२ वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे मौजे मुखेड येथील गट क्रमांक ६१ मध्ये ५३ आर शेतजमीन आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार ६ जुलै २०१६ रोजी मुखेड भूमी अभिलेख कार्यालयाचे निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल व शिपाई विवेकानंद खुडे हे मोजणी करण्यासाठी तक्रारदारांच्या शेतात गेले होते. मोजणी केल्यानंतर, अहवाल कोर्टात पाठवण्यासाठी साहेबांना पैसे द्यावे लागतील असे शिपाई खुडे याने तक्रारदारांना सांगितले होते.

त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदारांनी मुखेड कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, शिपाई खुडे याने तुम्ही पैसे दिले नाहीत, त्यामुळे तुमचा अहवाल पाठविला नाही. १५,००० रुपये द्या, त्याशिवाय तुमचे काम होणार नाही, असे म्हणून लाचेची थेट मागणी केली.

एसीबीकडून लाच मागणीची पडताळणी: तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३० ते १३:०० वाजण्याच्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालय मुखेड येथे लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान शिपाई खुडे याने तक्रारदाराचे काम निमतानदार सय्यद इमरान यांच्याकडून करून देण्यासाठी १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शवली. तसेच खुडे याने स्वतःच्या मोबाईलवरून सय्यद इमरान यांच्याशी तक्रारदाराचे बोलणे करून दिले असता, सय्यद इमरान यानेही मोबाईलवरून १५,००० रुपयांची लाच घेण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

सापळा कारवाई: लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १५:३० ते १६:०० वाजण्याच्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालय मुखेड येथे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी शिपाई विवेकानंद खुडे याने तक्रारदाराकडून १५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आरोपी विवेकानंद खुडे याला अटक करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पथक: ही यशस्वी कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर यांनी केली. या पथकात पोलीस अंमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले, सय्यद खदीर आणि प्रकाश मामुलवार यांचा समावेश होता. सदर कारवाई ला.प्र.वि. नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि पोलीस उपअधीक्षक  राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नागरिकांना आवाहन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास ला.प्र.वि. नांदेड कार्यालय (नागार्जुन सागर बिल्डिंग, स्नेहनगर, पोलीस कॉलनी, नांदेड) येथे किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२५३५१२ वर संपर्क साधावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!