नांदेड,(प्रतिनिधी)- प्रशासकीय सेवेत अत्यंत निष्ठेने व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवत उत्कृष्ट कामगिरी करणार्या सर्वगुण संपन्न व कुशल व्यक्तीमत्व म्हणून प्रसिध्द असणार्या स्व.सरोजताई देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा स्व.सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार आपल्या कार्याचा ठसा उमटवत प्रशासनात वेगळी ओळख निर्माण करणार्या परभणी येथे कार्यरत अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी पैंजने यांना जाहिर करण्यात आला असून गुरुवार दि.17 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा दै.समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मीमांसा फाऊंडेशन, दै.समीक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व पत्रकार प्रेस परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कार्याला अधिक बळकटी मिळावी आणि समाजासमोर त्यांच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने दरवर्षी विविध पुरस्कारांनी महिलांचा सन्मान करण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे 18 वे वर्ष आहे. स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार हा जिल्हा किंवा मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रासह देशभरात प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या महिला अधिकार्याला प्रदान केला जातो. गतवर्षी छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटीच्या उपायुक्त सौ. रंजना देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
स्व. सरोजताई विवेक देशपांडे यांनी यंत्र अभियांत्रिकी विभागात वीस वर्षांहून अधिक काळ उपअभियंता व कार्यकारी अभियंता म्हणून उल्लेखनीय प्रशासकीय सेवा बजावली. प्रशासकीय क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठेबरोबरच कुटुंबातील प्रत्येकाला आपलेसे करत सर्वांची काळजी घेणार्या आणि मनमिळावू स्वभावाच्या गृहिणी म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. कर्तव्य, माणुसकी, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुणांचा संगम असलेल्या या हरहुन्नरी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणार्या महिलांचा गौरव व्हावा, या भावनेतून त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा महसूल विभागातील प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव, धडाकेबाज निर्णयक्षमता, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधीलकी जोपासत प्रभावी काम करणार्या परभणीच्या अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी पैंजणे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
सदरील पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व लातूरचे संपादक रामेश्वर धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव पाटील, सहसंयोजक बालाजी दुधंबे, उपाध्यक्ष प्रा. अमृत जाधव, उपसंपादक ज्ञानेश्वर पवार, सुनील कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष दत्ताजी मोहिते, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, महानगराध्यक्ष रमेश देवडे, सौ. सुनिता चौहाण, सौ. सुनीता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ. अरुणा पुरी, सौ. पद्मावती झंपलवाड, शिवहरी गाडे यांच्यासह मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी केले आहे
