नांदेड (प्रतिनिधी) – किनवट येथील दोन अत्यंत संवेदनशील प्रकरणांनंतर वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चिखली फाट्यावरील तेलंगणा पोलिसांवरील हल्ला आणि एका आदिवासी विधवा महिलेवरील अत्याचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास झालेला विलंब यामुळे वादग्रस्त ठरलेले किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची अखेर नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नियंत्रण कक्षातील जगदीश मंडलवार यांच्याकडे किनवट पोलीस ठाण्याचा नवीन कार्यभार सोपवण्यात आला आहे.
चिखली फाट्यावरील थरार आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह रविवारच्या संध्याकाळी तेलंगणा पोलिसांनी किनवटमधून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला तेलंगणाकडे घेऊन जात असताना चिखली फाटा येथे संशयित शेख जाफर याच्या नातेवाईकांनी तेलंगणा पोलिसांवर थेट हल्ला केला आणि आरोपीला हातकडीसह सोडवून पळवून नेले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर या संशयिताला पुन्हा पकडून तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या अत्यंत संवेदनशील घटनेदरम्यान तेलंगणा पोलिसांना स्वसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला होता; अन्यथा त्यांच्या जीवावर बेतले असते. या संपूर्ण प्रकरणामुळे नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच, किनवट परिसरात विना क्रमांकाचे पिवळे ऑटो मोठ्या संख्येने फिरत असून ते चोरीचे असण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती, परंतु स्थानिक पोलिसांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही समोर आला आहे.
पीड़ित महिलेला पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवल्याचा आरोप दुसऱ्या एका गंभीर घटनेत, २० ऑगस्ट रोजी किनवटमधील गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात एका आदिवासी विधवा महिलेवर बालाजी केंद्रे नावाच्या व्यक्तीने दोन दिवस सतत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, ही घटना घडली तेव्हा राज्याच्या विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती नांदेड दौऱ्यावर होती. पीडित महिला गुन्हा दाखल करण्यासाठी किनवट पोलीस ठाण्यात गेली असता, पहिल्या दिवशी तिला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आणि तक्रार नोंदवण्यात आली नाही. या प्रकरणात सुरुवातीला तडजोड करण्याचा प्रयत्न आणि राजकीय दबावामुळे गुन्हा नोंदवण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला.
या दोन्ही लागोपाठ घडलेल्या गंभीर प्रकरणांमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेत आलेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याविरुद्ध बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून, जगदीश मंडलवार यांनी किनवटचे नवे ठाणेदार म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत.बदलीचे आदेश रात्री ११ वाजता पारीत करण्यात आले. मंडलवार यांना २.४५ तासात किनवट येथे पोहचण्यासाठी आदेश झाले आणि ते पोहचले आणि प्रभार बदलण्यात आला. आता जगदीश मंडलवार सर्व काही आलबेल करतील असे अपेक्षित असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांना.
