नांदेड(जिमाका) – राज्य शासनाच्या दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत महा-आयटीने प्रसिद्ध केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील काही शेतकरी मृत असल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकत नाही. अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांना वारस नोंद करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे.
मृत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये वारसांची नोंद करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधित कर्जखात्यातील शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वीच मृत झाल्याची माहिती बँकेने वारसांकडून प्राप्त झाल्यानंतर प्रचलित धोरणानुसार कर्जखात्यावर वारस नोंद करावी. त्यानंतर योजनेच्या पोर्टलवरील ‘Upload Deceased Accounts’ सुविधेद्वारे वारसांची माहिती अपलोड करावी.
मृत शेतकऱ्याच्या वारसाचा हिस्सा कर्जखात्यात नोंदविण्यासोबतच वारस खातेदारांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. यामध्ये वारस क्रमांक, बीआर-आयडी, वारस क्रमांक, कायदेशीर वारसाचे नाव, कायदेशीर वारसाचा आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, भ्रमणध्वनी क्रमांक, ॲग्रीस्टॅक नोंदणी, सीआयएफ, बचत खाते क्रमांक, पीएसीएस आयडी, पीएसीएस सभासद क्रमांक, कर्ज खाते क्रमांक तसेच कर्जातील वारसाचा हिस्सा आदी माहितीचा समावेश राहणार आहे.
महा-आयटीच्या पोर्टलवर ‘Upload Deceased Accounts’ सुविधेमधून माहिती अपलोड करताना केवळ मृत शेतकऱ्याशी संबंधित पूर्वीचा बीआर-आयडी व पूर्वीचा कर्जखाता क्रमांक यासह कर्जखात्याची माहिती एकाच संचिकेमध्ये अपलोड करावी. माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत शासकीय लेखापरीक्षकामार्फत कर्जखात्याची तपासणी करून घेण्यात यावी.
बँकेमार्फत अपलोड करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीवर महा-आयटीमार्फत योजनेच्या निकषांनुसार प्रक्रिया करण्यात येईल. त्यानुसार कर्जमाफीस पात्र असलेल्या कर्जखात्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह नव्याने आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून, आधार प्रमाणीकरणापूर्वी किंवा प्रमाणीकरणाच्या वेळी संबंधित वारसाची ॲग्रीस्टॅक नोंदणी अथवा फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
एका मृत कर्जदारास एकापेक्षा अधिक वारस असल्यास, योजनेच्या निकषांनुसार कर्जाच्या रकमेमधील वारसांच्या हिश्श्याच्या प्रमाणात कर्जमाफीची रक्कम कर्जखात्यात वर्ग करण्यात येईल. अपात्र वारसांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
वयस्कर अथवा बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही प्रक्रिया
वयस्कर किंवा बोटांचे ठसे न जुळल्यामुळे आधार प्रमाणीकरण होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन आधार कार्ड व बँकेचे पासबुक सोबत आणावे.
यादीतील विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जखात्याची सविस्तर माहिती तपासल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अल्पवयीन अथवा बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद घेता येईल. आधार प्रमाणीकरण करताना एका बोटाच्या ठशाने प्रमाणीकरण न झाल्यास वेगळ्या बोटाने किमान तीन वेळा प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करावा. तरीही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय वापरावा.
यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाने आधार प्रमाणीकरण करावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदार यांच्याकडे पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात स्वतःची ओळख निश्चित करण्यासाठी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, सातबारा उतारा आदी कागदपत्रे घेऊन जावे. तहसीलदारांकडून कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करण्यात येईल. आधार क्रमांक तोच असल्याचे निश्चित झाल्यास तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
नांदेड जिल्ह्यातील कर्जमुक्ती योजनेच्या यादीतील मृत कर्जदारांच्या वारसांनी तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधून वारसांची नोंद करून घ्यावी व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. तसेच आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.
