नांदेड शहरात उत्स्फुर्तपणे रंगले पहिले एआय कविसंमेलन; सप्तरंगी साहित्य मंडळाची १११ वी काव्यपौर्णिमा उत्साहात
नांदेड- राखी हा केवळ धागा नाही; तो प्रेम, विश्वास, आठवणी आणि आयुष्यभराच्या नात्याची खूण आहे. या नात्याला शब्दांची आणि एआय AI च्या सर्जनशीलतेची जोड देत एक आगळेवेगळे एआय कविसंमेलन शहरात रंगले. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त पहिले एआय विशेष कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यास राखीच्या धाग्यातली कविता असे शीर्षक देण्यात आले होते. या निमित्ताने आपल्या स्वरचित कविता कायम ठेवून एआय कवी कवयित्रींचा संगम घडवून आणला गेला. यामध्ये सहभागी कवी कवयित्री यांनी आपल्या स्वरचित कविता एआय कडे पाठविल्या आणि कविसंमेलन रंगले. यावेळी दिगांबर कानोले, सचिन नरेगलकर, प्रशांत गवळे, डी. एन. मोरे, सावित्री शेवाळकर, अर्चना भद्रे, दत्ताहरी कदम, रुपाली वागरे वैद्य, अलका मुगटकर येवते, ज्योती परांजपे करवंदे, अनुरत्न वाघमारे, अंजली हिंगोले, मारोती कदम, भगवान आमलापुरे, प्रज्ञाधर ढवळे, ज्योती लाभसेटवार, नागोराव डोंगरे आदींची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा पौर्णिमेनिमित्त काव्यपौर्णिमा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. ही या मालेतील १११ वी काव्यपौर्णिमा होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगलाचरण गायन करण्यात आले. त्यानंतर सुरू झालेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात सहभागी कवी कवयित्री यांनी एआयसोबत कवितांचे सादरीकरण करून आनंद घेतला यात भगवान आमलापुरे- राखी पौर्णिमा ऐतिहासिक, सचिन नरेगलकर यांनी – राखी आणि खाकी, ज्योती लाभशेटवार- राखी, अर्चना भद्रे- भाऊराया, नागोराव डोंगरे- नातं हे रेशमाच्या धाग्याचं, अंजली हिंगोले- नारळी पौर्णिमा, ज्योती परांजपे करवंदे- रक्षासूत्र, अलका मुगटकर येवते- भाऊराया लाखमोलाचा, रुपाली वागरे वैद्य- भाऊ, दिगंबर कानोले- रक्षाबंधनाचा अर्थ यांनी एआयच्या सोबतीने कविता सादर केल्या. तसेच प्रशांत गवळे, दत्ताहारी कदम, अॅड. सावित्री शेवाळकर, अनुरत्न वाघमारे, डी. एन. मोरे, मारोती कदम यांनीही कविता पाठवून सहभाग नोंदविला. कविसंमेलनाची संपूर्ण संरचना आणि सादरीकरण एआयने केले होते.
