हिमायतनगरात महिलेच्या हातातील रोकड हिसकावली; लोह्यात घरफोडीत २.९५ लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, हिमायतनगर येथे महिलेच्या हातातील एक हजार रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात आली, तर लोहा तालुक्यातील सुभाषनगर येथे घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील लकडोबा चौक परिसरात २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विशाल ऊर्फ मॅक्सवेल परमेश्वर टोटेवाड (रा. लकडोबा चौक, हिमायतनगर) याने फिर्यादी रोहित सायबु कारमोरे (वय २६) यांच्या पत्नी घराकडे जात असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील एक हजार रुपयांची रोकड हिसकावून नेली.

या प्रकरणी रोहित कारमोरे यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८(६), ३०९(४), ३०९(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

लोहा : दुसरी घटना लोहा तालुक्यातील सुभाषनगर येथे २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी वेजनाथ रामराव मुंडे (वय ३७) यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी चोरीच्या या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!