लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ४ ऑगस्ट २०२६ रोजी ३० वर्षीय पुरुष तक्रारदाराने तक्रार दिली. नंदनवन येथील गट क्रमांक ३३६ मधील ०.५५ आर शेतजमीन ही वडिलोपार्जित असून ती तक्रारदाराच्या आईच्या नावावर आहे. सदर जमीन आपल्या नावावर करण्यासाठी तक्रारदार तलाठी पालसाहेब मुंडे यांना भेटले असता, त्यांनी १२ हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता कंधार येथील तलाठी कार्यालयात मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तलाठी मुंडे यांनी १२ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी सापळा कारवाईसाठी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेला असता मुंडे कार्यालयात उपस्थित नव्हते. तक्रारदाराने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. १७ ऑगस्ट रोजीही भेटीचे ठिकाण निश्चित करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंदच असल्याचे निदर्शनास आले.
तलाठी मुंडे यांना संशय असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी मागणी केलेली १२ हजार रुपयांची लाच स्वीकारली नाही. तसेच ते कर्तव्यावर उपस्थित नसल्याचे आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे लाचेची रक्कम प्रत्यक्ष स्वीकारण्यात आलेली नाही.
या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना करपूडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोहेकॉ मेनका पवार, यशवंत दाबनवाड, पोका ईश्वर जाधव, सय्यद खदीर, शिवानन रापतवार, चालक पोहेकॉ गजानन राऊत आणि रमेश नामपल्ले यांचा सहभाग होता. कारवाईस पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांना आवाहन : कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. नांदेड घटक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२५३५१२ असून, ई-मेल dysp.acbnanded@mahapolice.gov.in असा आहे. भ्रष्टाचारविरोधी तक्रारींसाठी १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क साधता येतो
