पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन राजकुमार जोगदंड (वय २२, रा. दापका राजा) याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणाचा राग मनात धरून किशन जोगदंड याने आपल्या अन्य दोन साथीदारांसह संगनमत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता लादगा शिवारातील शेतात त्यांनी फिर्यादीचे वडील बाबू पुंडलिक गायकवाड (वय ६०) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी फिर्यादीच्या आईवरही चाकूने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १०३(१), १०९(१), ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर आणि परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि मुखेड पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढला. त्यानंतर विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अवघ्या पाच तासांत तिन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये किशन राजकुमार जोगदंड (वय २२, रा. दापका राजा), सोहम सुंदरसिंह बयास उर्फ सोन्या (वय १९, रा. मुखेड) आणि मंगेश निवृत्ती लिंगे (वय ५०, रा. मुखेड) यांचा समावेश आहे. पुढील कायदेशीर कारवाई मुखेड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि विठ्ठल घोगरे, सपोनि गोविंद खैरे, पोउपनि महेश कोरे, पोउपनि साईनाथ पुयड तसेच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, अभिजित तुतुरवाड, संदीप यामावार आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. गंभीर स्वरूपाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपींचा अल्पावधीत शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास मुखेड पोलीस करीत असून, आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
