महिला बचत गटांना सुवर्णसंधीः नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत;कृषी औजारे बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२’ अंतर्गत गावस्तरावरील शेती कामांच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी ‘कृषी औजारे बँक’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन गावातील महिला बचत गटांनी स्वतःचे उत्पन्न वाढवावे आणि शेतकऱ्यांना माफक दरात सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

योजनेचे मुख्य उद्देश

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. अशा शेतकऱ्यांना गावस्तरावरच पेरणीपासून काढणीपर्यंतची यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, शेतीकामातील महिलांचे कष्ट कमी करणे आणि हवामान बदलाच्या परिस्थितीत शेती अधिक फायदेशीर करणे ही या योजनेची प्रमुख उ‌द्दिष्टे आहेत.

पात्रता आणि अटी

प्रकल्प गावातील उमेद (MSRLM) किंवा माविम (MAVIM) पुरस्कृत महिला बचत गट आणि गाव संघ या योजनेसाठी पात्र आहेत(एक वर्ष पूर्ण असलेला व एका वर्षाचे सनदी लेखापाल यांचेद्वारे लेखा परीक्षण झालेले असावे ज्यामध्ये प्रकल्प रक्कमेच्या ५% उलाढाल व ५% भागभांडवल हवे). बचत गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल.  ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून कृषी औजारे बँकेचा लाभ घेतला आहे, ते या योजनेस पात्र राहणार नाहीत.

अनुदानाचे स्वरूप

या योजनेअंतर्गत कृषी औजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के अनुदान देय आहे(‘बॅक एंडेड सबसिडी’). अनुदानाची कमाल मर्यादा २४ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ३. २० लाख रुपयांपेक्षा जास्त प्रकल्प मूल्य असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे.

निवडता येणारी यंत्रे

बचत गट त्यांच्या गावातील पीक पद्धतीनुसार ट्रॅक्टर, बीबीएफ (BBF) यंत्र, बेड मेकर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र यांसारखी हवामान अनुकूल तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणारी औजारे निवडूशकतात. ट्रॅक्टर खरेदी करावयाचा असल्यास त्यासोबत किमान तीन ट्रॅक्टरचलित औजारे खरेदी करणे आवश्यक आहे(टेस्ट रीपोर्ट असणारे).

अर्जाची प्रक्रिया

इच्छुक महिला बचत गटांनी ‘FPO-DBT-Portal’ या वेब प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅप्लिकेशनवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि बॅक विवरणपत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/8/२०२६ असून अधिक माहितीकरिता आमचे संकेतस्थळ www.ndksp. mahapocra.gov.in ला भेट द्या, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

दहावीचे अर्ज भरा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता #दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच आयटीआयच्या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट योजनेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. विलंब शुल्कासह अर्ज १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत स्वीकारले जातील. तर अतिविलंब शुल्कासह अर्ज १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क संकलित करून ते निर्धारित पद्धतीने मंडळाकडे जमा करावे. शुल्क पावत्या व विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळांकडे ७ डिसेंबर २०२६ पर्यंत सादर करावयाची आहे.

अर्जातील नाव, जन्मतारीख व अन्य तपशील काळजीपूर्वक तपासून विद्यार्थी आणि पालकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे निर्देश मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना दिले आहेत. अर्जासोबत छायाचित्र अपलोड करताना निर्धारित निकषांचे पालन करण्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने सर्व संबंधित शाळा, विद्यार्थी आणि पालकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!