नांदेड(प्रतिनिधी)- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सर्वाधिक मतदान करा. कारण भारतात झालेल्या लोकशाहीतील मतदानाचा प्रभाव जगावर पडतो आणि त्यामुळे भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी बदलते असे प्रतिपादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले की, महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या घरी जाऊन माझा प्रणाम सांगा त्यामुळेच आम्ही मतदान केंद्र जिंकू शकू.
नांदेड लोकसभा मतदार संघाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभा मतदार संघाचे बाबुराव कदम या महायुतीच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेसाठी नांदेड येथे मोदी यांचे आज आगमन झाले होते.
व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,खा.डॉ.अजित गोपछडे, संघटनमत्री संजय कौडगे, महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. भिमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. बालाजीराव कल्याणकर, आ.संतोष बांगर, आ.तानाजी मुटकूळे, आ. राजू नवघरे, आ.नामदेव ससाणे, लोकसभा समन्वयक व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष हिंगोली फुलाजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष आरपीआय विजय सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.पुनमताई पवार, प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा सौ.प्रणिताताई देवरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदराव बोंढारकर, भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी मोदी बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे शहाजादे राहूल गांधी यांनी पारंपारिक मतदारसंघ अमेठीतून पळ काढला, आता वायनाडही सोडण्याची आणि दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कधी नव्हे इतकी बिकट अवस्था कॉंग्रेसची झाली आहे. इंडिया आघाडीतील पक्ष देशातील 25 टक्के मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढत आहेत, परस्परांविरुद्ध आरोप करीत आहेत.अशी बिकट अवस्था इंडिया आघाडीची झाली आहे. एवढेच नव्हे, तर निवडणुका घोषीत होण्याआधीच कॉंग्रेसवर पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली, या निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय निश्चित असून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजुने झालल्याने एकतर्फी मतदानामुळे पुन्हा एनडीएचे सरकार देशात सत्तारुढ होणार हे आता स्पष्ट झाले आहेे.
देशातील शेतकरी, शेतमजुर, महिला, युवा वर्ग यांच्यासाठी एनडीए सरकार एक मजबूत व सुरक्षित भिंत म्हणून उभी आहे.कोट्यवधी महिलांसाठी सरकारने शौचालये उभारली, 50 कोटी गरीबांसाठी बॅंक खाते उघडून दिले,डिजीटल इंडिया तंत्रज्ञान आणून त्या माध्यमातून व्यवहार सुरु झाले, परंतु आमच्या सर्व विकास योजनांची कॉंग्रेस खिल्ली उडवित आहे, देशातील जनतेचा अपमान करीत आहे. हा अपमान देशातील जनता सहन करणार नाही, मराठवाडा, विदर्भ मागास राहण्याला कॉंग्रेस जबाबदार असून पायाभूत सुविधा नसल्याने शेतकरी, गरीब, युवकांना कॉंग्रेसने वाऱ्यावर सोडले, या भागाच्या विकासासाठी एनडीए सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले, या समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण कायम टिकाणारे आहे.अद्याप कोर्टाने आमच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही, ज्यांनी आरक्षणा देतो म्हणून समाजाची दिशाभूल केली, त्यांचे ऐकू नका,विरोधकांकडून गैरसमज, अपप्रचार सुरु आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणारच हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर सभेत दिली.
झालेल्या जाहीरसभेत मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसवर तसेच इंडिया आघाडीवर सडकून टिका केली. देशात मोदी गरंटीची प्रचंड लाट सुरु आहे.प्राण जाए पर वचन न जाए ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. इंडिया आघाडीतील नेते म्हणतात आमच्याकडे सोनिया आहे, राहूल आहे, केजरीवाल आहे, परंतु देशातील जनता म्हणते आमच्याकडे मोदी गॅरंटी आहे.विकासाचे दुसरे नाव मोदी गॅरंटी आहे, गरीबी हटाओचा नारा देणाऱ्या कॉंग्रेसने गरीब हटवला, परंतु गरिबी हटवली नाही, देशातील गरीबांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याची गॅरंटी मोदींची आहे,त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे गरजेचे आहे.कॉंग्रेसचे नेते आपसातच लढत आहेत, कॉंग्रेस स्वतःच पराभवाच्या वाटेवर असून या पक्षाला स्वतःच टिकण्याची गॅरंटी नाही. त्याचा पराभव करण्यासाठी फारसे प्रयत्न करण्याची गरज नाही, विदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे व पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या राहूल गांधींना देशातील जनता स्वप्नातही पंतप्रधान होऊ देणार नाहीत. अहंकारी कॉंग्रेसची जनतेलाच गॅरंटी नाही, संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभे राहयचे आहे.त्यांनी देशाची सुत्रे स्वीकारल्यापासून देशात कुठेही दंगल,बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया घडल्या नाहीत, शिवाय त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. नरेंद्र मोदी हे त्यागी पंतप्रधान आहेत.
यावेळी बोलताना खा.चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील ही पहिलीच सभा आहे.मतदानाला शेवटचे चार-पाच दिवस शिल्लक असून मतदानासाठी मतदार उत्सुक आहेत. देशात ज्याप्रमाणे भाजपा मित्रपक्षांच्या बाजूने कौल आहे, तिच स्थिती संपूर्ण मराठवाड्यात आहे. विकसीत भारताचा नारा हा देशाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी आहे. मी आणि अजित गोपछडे राज्यसभेचे खासदार आहोत, नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह हिंगोली आणि लातूर या मतदाररसंघातूनही भाजप-मित्रपक्षांचे उमेदवारांचा विजय निश्चित आहे. जिल्ह्यात एकुण पाच खासदारांची वज्रमूठ तयार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टिकोन सर्वांच्या प्रयत्नातून साकार करायचा आहे.संविधान बदलणार अशा अफवा पसरविल्या जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलणार नाही, आरक्षणही रद्द होणार नाही, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, कुणबी समाजाला प्रमाणपत्रेही दिली, सगेसोयऱ्यांचा उर्वरित प्रश्नही सुटणार आहे. जरांगे पाटील यांना मी भेटलो, मराठा समाजासाठी सुरु असलेला त्यांचा लढा याबद्दल मी त्यांचे अभिनंदनही केले, त्यांच्या सर्व मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्याचे मी स्वतः त्यांना अभिवचन दिले, त्यामुळे कुठलाच प्रश्न आता शिल्लक राहिलेला नाही. येत्या 26 तारखेला खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व हिंगोलीतून बाबुराव कदम यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.