नांदेड (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून माजी आ. वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली असली तरी हे उमेदवार डमी आहे. काँग्रेस पक्षातील लोकप्रतिनिधी दिवसभर प्रचार करून रात्री अशोक चव्हाणांच्या घरी जातात असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. अविनाश भोसीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला लोकसभेचे उमेदवार अॅड. अविनाश भोसीकर, राज्य सचिव शाम कांबळे, अक्षय बनसोडे, कामगार संघटनेचे नेते राजेश अटकोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी याा दोघांमध्येच ही लढाई होणार आहे. कारण काँग्रेसचा उमेदवार हा अशोक चव्हाणांच्या बी डीमचा उमेदवार आहे. २० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा पार पडल्यानंतर काँग्रेसचा असणारा डमी उमेदवार हा तुम्हाला मैदानातून बाहेर पडलेला दिसणार. अगोदरच हा उमेदवार शारिरीक दृष्ट्या तंदुरूस्त नाही. तो वैद्यकीय कारण दाखवून कोणत्या तरी दवाखान्यात उपचार घेत असलेला दिसेल. म्हणजेच भाजपला निवडुण आणण्यासाठी काँग्रेसने हा डमी उमेदवार दिलेला आहे. लोकसभा मतदार संघात मी दिवसरात्र फिरत असतांना काँग्रेसचा उमेदवार मला कुठेही आढळून आला नाही. त्यांच्या ना सभा ना दौरे अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे. केवळ भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने वसंत चव्हाणसारख्या डमी माणसाला उमेदवारी देवून या ठिकाणचा काँग्रेसचा पारंपारीक मतदार शाबुद ठेवण्यासाठी हा उमेदवार दिला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. अविनाश भोसीकर यांचे प्रचारार्थ अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची दि. १९ एप्रिल रोजी नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी १ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आली. या सभेला लाखोच्या संख्येने मतदार उपस्थिती राहतील असा आशावाद वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. याचबरोबर जास्तीत जास्त मतदारांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.