नांदेड (प्रतिनिधी) – शिक्षक म्हणजे समाजाचा आरसा, पण जेव्हा हाच आरसा रक्ताने माखतो आणि व्यवस्थेच्या भेसूर चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे करतो, तेव्हा माणुसकीची मान शरमेने खाली झुकते. कामठा गोपाळ नगर येथील शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या करून स्वतः जीवन संपवले, ही घटना केवळ एक गुन्हेगारी नोंद नसून ती प्रशासकीय सुस्तीचा जिवंत पुरावा ठरत आहे. वेळेचे गणित की मृत्यूचा सापळा? या संपूर्ण प्रकरणात सर्वात जास्त बोचणारा प्रश्न म्हणजे पोलिसांच्या कार्यतत्परतेचा. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील मोरे यांच्या पत्नीने १७ जुलै रोजी सकाळी 7.21 वाजता 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मदतीची याचना केली होती. मग प्रश्न असा पडतो की, ज्या खाकीवर सामान्यांचा विश्वास असतो, त्या खाकीला स्टेशन डायरीमध्ये या घटनेची नोंद करण्यासाठी दुपारचे १:४२ का उजाडावे लागले? सकाळी 7 ते दुपारी 1.40 (13.42) या सहा तासांच्या ब्लॅक आउट मध्ये नेमकं काय घडलं? जर पोलिसांनी तात्काळ हालचाल केली असती, तर सारा आणि सुमित या दोन कळ्या उमलण्याआधीच खुडल्या गेल्या नसत्या का? शिक्षण विभागातील पांढरपेशी चेहरे कोण? सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी ठेवलेल्या स्टेटसने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. यात शिक्षण विभागातील अनेक बड्या धेंडांविरुद्ध तक्रारीचा सूर होता. एका शिक्षकाला आपल्याच विभागातील लोकांमुळे इतके टोकाचे पाऊल उचलावे लागते, हे शिक्षण क्षेत्रातील सडलेल्या मानसिकतेचे दर्शन घडवते. पोलिसांनी या नावांची दखल घेतली आहे, पण कारवाईची सुई मात्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. तपासाचे मृगज’ आणि उशिरा सुचलेले शहाणपण मोबाईल लोकेशन देगलूर नाका आणि मरघाट दाखवत असताना पोलीस तिथे पोहोचले, पण रिकाम्या हाताने परतले. त्यानंतर पडली येथील आमदुरा पुलाजवळ गाडी सापडली, जिथे सारा आणि सुमितचे गळा आवळून हत्या केलेले मृतदेह आणि सुनील मोरे यांचा मृतदेह मिळाला ही घटना घडून गेल्यावर पंचनामे आणि नोंदीचा पाऊस पाडणाऱ्या यंत्रणेला वेळेवर जाग का आली नाही, हाच आज नांदेडकरांचा मुख्य प्रश्न आहे. एका कुटुंबाचा अंत झाला, दोन निष्पाप जीवांची स्वप्ने नदीच्या पात्रात बुडाली. आता उरल्या आहेत त्या फक्त कागदी नोंदी आणि प्रशासकीय उत्तरे. पण या उत्तरांनी त्या मातेची कूस पुन्हा भरणार आहे का? प्रशासकीय दिरंगाईच्या या उकिरड्यावर आता तरी न्यायाचा अंकुर फुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात पोलीस स्टेशन डायरीला बायबल असा उल्लेख केलेला आहे.देव करो ही डायरी नोंद सुद्धा बायबलच ठरो. संबंधित बातमी .. सुनील मोरे प्रकरण: केवळ आत्महत्या नाही तर आपल्या दोन अपत्यांची क्रूर हत्या; समाजाने अंतर्मुख होण्याची गरज! #JusticeForKids #NandedPolice #SystemFailure #SunilMoreCase #AdministrativeDelay Kanthak Suryatal Post Views: 1,204 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation २४ तासांपूर्वी अटक, आज महासंग्राम! जंतर-मंतरवर सोनम वांगचुक पुन्हा मैदानात, सरकारचे टेन्शन वाढले? मी मुख्यमंत्री नसतो तर… – मोदींचे ते शब्द आणिआजचे जंतरमंतरचे वास्तव!