नांदेड लोकसभा उमेदवारांची 12 एप्रिलला प्रथम खर्च तपासणी; उमेदवारांना उपस्थिती अनिवार्य

नांदेड – नांदेड लोकसभा निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा खर्च खर्च समितीकडे सादर करण्यासाठी 12 एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 6 या कालावधीत उमेदवारांना निरीक्षकांसमक्ष खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी यासंदर्भातील आज पत्रक जारी करून 12 एप्रिलच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार काही नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे या बैठकांना उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अनिवार्य असते.

 

लोकसभा निवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी प्रथम तपासणी तारीख निश्चित करण्यात आली आहे.कै.डॉ शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह पहिल्या मजल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही प्रथम तपासणी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीद्वारे नामनिर्देशित करण्यात आले,अशांकडून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केलेल्या तारखांना स्वतंत्र व अचूक हिशोब सादर करणे आवश्यक आहे.

 

अनुपस्थितीत राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांच्या अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी कसूर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये ३ वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ( अपात्र )ठरविण्यास पात्र असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!