मला कळतं तेंव्हापासून ते काही वर्षांपूर्वीपर्यंत सहसा कोणतेही नाटक बघण्याची संधी मी सोडली नाही.आता प्रत्येकवेळी ते शक्य होत नाही कारण , आजकालचे नाटकाच्या तिकिटांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत.पूर्वीचे नटसम्राटही स्वतःचे मानधन मागताना निर्माते,सहकलाकार,रसिक ह्यांचे नाट्यवेड आणि आपली नाट्य समर्पितता ह्याचे भान ठेवत असत.नाट्यक्षेत्रात एक निर्माता,लेखक, दिग्दर्शक म्हणून नाव झाल्यावर अनेक नाटकांच्या सन्मानिका यायच्या,येतात.पण,नाटक मोफत बघणं मला कधीच आवडलं नाही.म्हणून सध्या थोडी संधी असून उपासमार… नाटक मग ते उमरी असो,नांदेड असो की मुंबई, औरंगाबादला. जवळपास प्रत्येक नाटक मी बघायचो. त्यावेळी मी औरंगाबादला म्हणजे आजच्या संभाजीनगरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात शिकत होतो तेंव्हा संत एकनाथ रंगमंदिरात ” एकच प्याला ” नाटक येणार म्हणून कळालं. राम गणेश गडकरी ह्यांचं अजरामर नाटक बघायला मिळणार हा आनंद होताच पण, मूळ नाटकातील काहीच कलावंत उरलेले.त्यातील वयोवृद्ध पण चिरतरुण कलावंतांनी नाटक उभं केलेलं.सुधाकराच्या भूमिकेत श्रेष्ठ नट चित्तरंजन कोल्हटकर… बस नाम ही काफी था ! पहिल्या पिढीतील पिकल्या पानांचा दरवळ संपूर्ण रंगमंदिरात… तरुणाईतील आमच्यासारखे मोजकेच.कारण,आमच्या काही मित्रांना त्यातही नाट्यशास्त्र विभाग,अनेक चॅनल्स, आधुनिक सिनेमा,समांतर नाटके बघायला मिळणाऱ्या पिढीला कथाप्रधान पण शब्दबंबाळ त्यातही संगीत नाटक असणाऱ्या एकच प्याला नाटकाचा प्रयोग बघण्यापेक्षा उस्मानपुऱ्यातील पानपट्टीवर उभे राहून सिगारेटचे कश मारत आणि आपल्या पहिल्या वार्षिक नाट्य महोत्सवातील प्रथम प्रयोगाचे रसभरीत वर्णन इतरांना सांगण्यात आनंद होता.पण, खरोखर नाटक सर्वांगाने समजून घेणारे आम्ही काही अभ्यासू रंगकर्मी मित्र रंगमंदिरात नाटक बघत होतो. हृदय पिळवटून टाकणारे संवाद, प्रत्येकाचा जिवंत अभिनय,काळानुरूप नेपथ्य,प्रकाश,वेशभूषा,रंगभूषा,संगीत सर्व मार्गांनी आमचे रसग्रहण चालू होते. प्रभावी पद्धतीने नाटक टिपेला गेलेलं… आणि सगळीकडे हुंदके, शांतता.पडदा पडला.बघतो तर अर्ध्याच्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी… डोळ्यात पाणी. मी पूर्वीपासून वास्तववादी,पुरोगामी आंबेडकरी प्रवाहाचा नाटककार,वाहक… त्यामुळे तत्कालीन ह्या सामाजिक नाटकाचा परिणाम गेल्या शतकभरात काय पडला ? हे जाणून घेण्याची उत्कट इच्छा. सगळ्यात शेवटी ग्रीन रुममध्ये गेलो.चित्तरंजन कोल्हटकर आणि सर्व कलावंतांना चरणस्पर्श केला.नाटक आणि अभिनयाचे कौतुक करून माझा परिचय सांगितला आणि ” सर, माझ्या मनात काही प्रश्न आहेत ते विचारायचे होते ” असे मी म्हणताच एकतर नाट्यशास्त्राचा विद्यार्थी आणि त्यात केवळ कौतुक नाही तर प्रश्न घेऊन आलेला. त्यांना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यांत दिसत होता. ” बोल बेटा,तुला वाटेल ते प्रश्न विचार.” म्हणाले. ” सर, ह्या नाटकातील बदलत्या रंगावृत्तीनुसार अनेकांनी हे नाटक सजवले, गाजवले आहे.पण तुम्ही स्वतः हे नाटक खूप पूर्वीपासून म्हणजे कधीपासून करता ? ” त्यांनी मोठा कालावधी सांगितला. ” नाटक ही प्रेक्षकांना विचारप्रवण करणारी,त्याला निर्णय घेण्यास भाग पाडणारी कला जर आहे…तर गडकरींची प्रभावी संहिता, तुमचा जिवंत अभिनय आणि शोकात्म शेवट ह्याचा एकत्र परिणाम होऊन आजपर्यंत दारू सोडलेले किती प्रेक्षक तुम्हाला भेटले ? ” सर विचारमग्न…आजुबाजूच्या लोकांमध्ये चुळबूळ… आणि मोठा विराम तयार झाल्याने मला तशा व्यसनमुक्त झालेल्या मोठ्या संख्येतील प्रेक्षकांची अपेक्षा होती… थोडा वेळ स्तब्ध वातावरण. ” आजपर्यंत एकही नाही.” … खरं तर प्रस्थापित अनेक नटश्रेष्ठांसारख्या आपल्या अभिनयाच्या प्रभावी परिणामांच्या व्यापक बढाया ते मारू शकले असते .पण नाटक ही त्यांची पवित्र तपस्या होती.त्यामुळे एवढे प्रामाणिक उत्तर त्यांनी दिले असावे. सरांच्या ठाम पण उदास उत्तराने माझ्या जणू माझ्या पायाखालची जमीन सरकलेली.कारण अनेक समीक्षेची पुस्तके आणि नाट्य समीक्षक ज्यांचे विचार माझ्या तरूण मनावर आजवर ठसले होते.त्यांनी तर परिणाम होतो, मोठा परिणाम होतो असे सांगितलेले.आज नेमके त्याच्या विरुद्ध ऐकत होतो. एवढी मोठी तपस्या असणारे कोल्हटकर ह्यांनी मला कोणतेही उत्तर दिले तरी ते पटण्यासारखे असते.पण इतकं परखड मत… मी पुन्हा नव्या शब्दात तोच प्रश्न विचारला.सर म्हणाले, ” कोणत्याही कलेचा समाजमनावरील प्रभाव काही काळ टिकतो.पण ह्या वेगवान वर्तमानात तो पुन्हा रमला की तो विषय मागे पडतो,त्या विषयाचे गांभीर्य संपते. त्यामुळे ” कलेमुळे समाज बदलतो असे माझे तरी ठाम मत नाही.” सर म्हणाले. ” तुम्हाला आजपर्यंत प्रयोगानंतर हजारो व्यसन असणारे प्रेक्षक पश्चातापदग्ध होऊन तरी भेटले असतील ना ? “… माझे उत्खनन चालूच. ” तात्कालिक परिणाम झालेले हजारो प्रेक्षक भेटले मित्रा.पण, एवढ्या मोठ्या कालखंडात नाटक संपल्यावर एक घटना घडली.फक्त एक व्यक्ती जो ट्रक ड्रायव्हर होता.तो पेढे, हार आणि सोबत कुटुंब घेऊन प्रयोगानंतर आला होता.आल्याबरोबर त्याचे कुटुंबीय आधी माझ्या पाया पडले.माझ्या पाया पडत तो म्हणाला,” साहेब,तुमचे नाटक मागच्या प्रयोगात बघून मला खूप मोठा पश्चाताप झाला. आणि मी दारू सोडली.आज माझा संसार खूप सुखात आहे.म्हणून तुमचा आशीर्वाद घेऊन आभार मानण्यासाठी भेटायला आलो.” विविध प्रवाहांचा अभ्यास करणाऱ्या वाचकासाठी,नाटकाच्या चिकित्सक विद्यार्थ्यासाठी एवढे उत्तर पुरेसे नव्हते. मी म्हणालो, ” मग एवढे अतोनात परिश्रम घेऊन, लाखो रुपये खर्च करून नाटके निर्माण करायचे कुणासाठी ? ” सरांनी मंद हसत माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ” त्या एका प्रेक्षकासाठी ! ” आणि शांतपणे ते सगळ्यांसोबत जेवायला निघाले. सगळे प्रेक्षक गेलेले,कर्मचारीही निघालेले…मी रंगमंदिरासमोरच्या गवतावर बसलेलो… महाकवी वामनदादा कर्डक यांच्या वादळी जीवनाची कारकीर्द बघत हळूहळू मोठा होत जाणारा मी … त्यादिवशी एक साक्षात्कार मला झाला,” कला क्रांती करू शकत नाही पण क्रांतीला लागणारी मस्तकं घडवित असते.” आणि ही मस्तकं मायेनं,शिस्तीनं, सातत्य राखून जी समांतर व्यवस्था उभी केली जाते.त्यातून चळवळ उभी राहते.आणि ती जर प्रामाणिक, निडर आणि अभ्यासू असेल तर ती क्रांती केल्याशिवाय राहत नाही.म्हणून तर जगात अनेक क्रांत्या कलावंतांनी केल्या. मी चेतक स्कूटर घेऊन रुमकडे निघालो. सभागृह परिसरातील एकेक दिवा बंद होत होता.आणि माझ्या मन आणि मेंदूत परिवर्तनाचे अनेक दिवे पेटले होते. -डॉ. विलासराज भद्रे, अमृत होमिओ क्लिनिक,नांदेड. Mob : 9890145726. Kanthak Suryatal Post Views: 609 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल शीख आणि सरकारची भूमिका;महाराष्ट्र सरकारला शीख समाजाच्या वतीने एक स्पष्ट, ठाम आणि कळकळीची विनंती.