नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील मुळाज परिसरात शनिवारी (११ जुलै) मध्यरात्रीनंतर घडलेल्या एका धक्कादायक घटनेत २४ ते २५ वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत युवकाची ओळख सचिन यशवंत काळे (रा. नुरी चौक, नांदेड) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी सचिन काळे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सचिन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून परिसराची पाहणी करण्यात आली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाजवळील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात आहे.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शहरात भररस्त्यात घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे नांदेड पुन्हा एकदा हादरले असून नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

