नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात Made in Pakistan लेबल असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची अवैध विक्री करणाऱ्या ‘अफरा कलेक्शन’ या दुकानावर इतवारा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ३९,६९,९४० रुपयांचा बनावट सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस पथकाची कामगिरी: ही मोठी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. या पथकात खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
- पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ
- पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे आणि सिद्धेश्वर गायकवाड
- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बेग
- पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम
- पोलीस कॉन्स्टेबल रेवणनाथ कोरनुळे, काकासाहेब जगताप आणि शेख

आरोपी आणि जप्त माल: या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद जियाउद्दीन मोहम्मद वाजीद (वय २५ वर्ष, रा. मल्लार गल्ली, नांदेड; ह.मु. हैदराबाद देगलूर नाका, नांदेड) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लार गल्लीतील अफरा कलेक्शन मध्ये बनावट पाकिस्तानी क्रीम्स विकल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. छाप्यात प्रामुख्याने USMA Beauty Cream, Ultra Glam Beauty Cream, Double White VC Beauty Cream, UJOOBA Beauty Cream, Maniya Beauty Cream आणि Face Gold Beauty Cream यांसारख्या विविध ब्रँड्सचा साठा जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाई: आरोपीविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२३, ३१८(४) सह विदेशी व्यापार अधिनियम कलम ३(३), ११(२) आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या कलम १८(सी), २७(२)(बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला माल अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना उत्पादकाची माहिती आणि गुणवत्तेची खातरजमा करावी.

