नांदेड (प्रतिनिधी)- बाचोटी येथील प्रगतिशील शेतकरी आणि सेंद्रिय शेतीला वाहिलेल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मान्यता मिळाली आहे. बाचोटी येथील आंब्याच्या बागेला सलग तिसऱ्या वर्षी ऑर्गेनिक (सेंद्रिय) शेतीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल शेतकरी आणि त्यांचे सुपुत्र साईप्रसाद वरपडे पाटील यांचा जिल्हा परिषद, नांदेड येथे गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड तसेच कृषी अधिकारी कळसाईत यांच्या हस्ते उत्तम वरपडे पाटील आणि साईप्रसाद या पिता-पुत्रांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सलग तिसऱ्या वर्षी ऑर्गेनिक प्रमाणपत्र मिळणे ही त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची, दर्जेदार उत्पादनाची आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतीची पावती मानली जात आहे.
वरपडे पाटील यांनी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करत सेंद्रिय तत्त्वांवर आधारित आंबा उत्पादनाची कास धरली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे बागेतील फळांचा दर्जा उंचावला असून ग्राहकांनाही सुरक्षित व गुणवत्तापूर्ण फळे उपलब्ध होत आहेत.
या गौरवाबद्दल कृषी क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा अवलंब करावा, असा संदेश या यशातून मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सलग तिसऱ्या वर्षी मिळालेल्या या सन्मानामुळे वरपडे पाटील कुटुंबाचा उत्साह द्विगुणित झाला असून, भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक शेती करण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
