अर्धापूर (प्रतिनिधी) – खेळातील कौशल्य, शिस्त आणि निष्पक्षतेच्या बळावर महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुटवार यांची चीनमधील शियाँग्लो येथे होणाऱ्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ (ISF World School Games) साठी पंच (Referee) म्हणून अधिकृत निवड झाली आहे. या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवात भर पडली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोजक्याच पंचांना मिळते. अशा मानाच्या स्पर्धेसाठी चंद्रकांत पुलकुंटवार यांची झालेली निवड ही त्यांच्या दीर्घकालीन क्रीडा अनुभवाची, नियमांचे सखोल ज्ञान आणि निष्पक्ष पंचगिरीची पोचपावती मानली जात आहे. पोलिसी कर्तव्याची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, निर्णयक्षमता आणि क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानामुळे त्यांना ही आंतरराष्ट्रीय संधी मिळाली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी कर्मचारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध सामाजिक संघटनांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या यशामुळे पोलीस दलातील अनेक तरुण खेळाडू व क्रीडाप्रेमींना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.चीनमध्ये होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत भारतीय पंच म्हणून चंद्रकांत पुलकुं टवार निष्पक्ष आणि दर्जेदार पंचगिरीचे दर्शन घडवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ अर्धापूर पोलीस स्टेशनच नव्हे, तर महाराष्ट्र पोलीस दलाची खाकी वर्दीही आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर अभिमानाने झळकणार आहे.
